बांदा :
संपूर्ण जग आज कोरोना सारख्या महामारीने ग्रासलेले आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता येत नाही, तरीही ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे जागतिक योग दिन होय.
बांदा येथील व्हि .एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी घरीच राहून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके केली आणि घरीच ऑनलाईन पद्धतीने जागतिक योग दिन साजरा केला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना यावेळी योगाविषयी मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात योगाचे महत्व, योगाचे फायदे याविषयी गुगल मिटद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे कोरोना महामारीची येणारी तिसरी लाट विद्यार्थ्यांसाठी खूप घातक आहे. त्यासाठी घाबरून न जाता विद्यार्थ्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, कोणते व्यायाम प्रकार करणे आवश्यक आहे, कोणता आहार घ्यावा या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रशालेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन भरभरून प्रतिसाद मिळाला.