You are currently viewing वैभवा, अजब तू रे आमदार!!

वैभवा, अजब तू रे आमदार!!

*हौसेने स्वतःचा कचरा करून घेणारा आमदार म्हणजे वैभव नाईक! : पत्रकार परिषद घेत माजी खासदार निलेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांना अक्षरशः धुतले.*

 

शिवसेनेचा वर्धापन दिन होता. या वर्धापनदिनादिवशी आमदार वैभव नाईक यांनी जो प्रकार केला, त्याला नाटक किंबहुना त्याही पलीकडे जात चिंधीगिरी असे म्हणता येईल. वर्धापन दिनादिवशीच वैभव नाईक यांनी स्वतःचा कचरा करून घेतला. करायला काही भलतंच आला होता. पोलिसांच्या गराड्यात आला आणि गराड्यातच पळून गेला. स्वतःहून स्वतःचा इतका कचरा एखाद्या आमदाराने करून घेण्याचे उदाहरण इतिहासात दुसरे नाही. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे,  शंभर रुपयाची दोन तीन पाकीट दाखवून मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पेट्रोल दरवाढीसाठी आंदोलन करतोय आणि आहे त्याच दरात स्वतःच्या पंपावर पेट्रोल विकत धंदा करणारा हा आमदार, स्वतःच्या पंपावर तरी कधी कोणाला शंभर रुपयाचं पेट्रोल दिल्याचे कोणाला आठवतंय का? दोन टर्ममध्ये काहीही काम करता न आल्यामुळे आज टपोऱ्यासारखे स्टंट करण्याची वेळ आली आहे. हा माणूस आदराने कधीही “साहेब” होऊच शकत नाही, हा कायम “वैभ्या” च राहणार, हीच याची लायकी आहे, अशी घणाघाती टीका आज कुडाळ येथे भाजपा नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले, की पक्ष त्याच्या बरोबर नाही, जनमत नाही. मागे शिवसेनेच्या शाखेसमोर ताडपत्र्या विकत होता. त्याची दखल मी घेण्याची गरज नाही. पण माझ्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी काल  त्याची जी “दखल” घेतली, त्याचा डाव हाणून पाडला त्याबद्दल त्या सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन करायला, आभार व्यक्त करायला मी आलो आहे.

वैभव नाईक याच्यासारखा भित्रा, शेळपट आणि बोलघेवडा आमदार कोणी नाही, हे काल पुन्हा एकदा दिसलं. यापूर्वी कणकवलीत पोलीस जिल्हाप्रमुखांना नडल्याच्या बाता हा करतोय, पण त्याचा व्हिडीओ आहे. समोर शिवसैनिकाला ते पोलीस अधिकारी बेदम “शिवप्रसाद” देत असताना आमदार वैभव नाईक त्याला वाचवायला करंगळीभर पुढे सरकला नाही, हा वैभव नाईक! अजून त्याला आपला कचरा करून घ्यायचा असेल, तर हरकत नाही. पण त्यापेक्षा जनतेची सेवा कर, अपघाताने निवडुन आलास, बाकी काही लायकी नाही.  उद्धव ठाकरेंनी हे ओळखल्याने एकदाही मंत्रिपद दिलं नाही. बोलण्यासारखं खूप आहे, पण ही वेळ नाही. जनतेची सेवा कर, कुडाळ-मालवणला त्याची गरज आहे. वाट लावली या मतदारसंघाची! भाऊ ठेकेदार असताना रस्त्याची वाट लावली. आरोग्याचा बट्याबोळ केला. ओळख काय याची? आमदारकीची शपथ घेताना सुप्रिया सुळे नसत्या तर याला विधानसभेत प्रवेशही मिळाला नसता. असले शंभर वैभव नाईक राणे खिशात ठेवतात.

कालच्या घटनेवर बोलताना निलेश राणे पुढे म्हणाले की दुसऱ्याच्या मालमत्तेत घुसताना आणि त्याच्या व्यवसायाचे नाव घेऊन जाहिरातबाजी करताना त्याची परवानगी घ्यावी लागते. एवढी साधी अक्कल या आमदाराला नाही. दुसरीकडे पोलिसांची भूमिका चुकीची आहे. त्यांच्या भूमिकेविरोधातही कोर्टात जावे लागेल. पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या या आमदाराचा व्हिडीओ आहे. तरीही कुडाळचे पोलीस अधिकारी ते नाकारत वैभव नाईक यांना पाठीशी घालत आहेत. मुळात, पोलिसांना पूर्वकल्पना दिली असताना पोलीस संरक्षणातच वैभव नाईक तिकडे आलाच कसा? आणि मग सहकाऱ्यांनी त्याला हाकलून लावला, तर त्यांच्यावर गुन्हे कशाला? या प्रकरणात कुडाळ पोलिसांना पक्षकार करून कोर्टात तक्रार करण्यात येईल आणि तिथे त्या घटनेच्या क्लिप्स पुराव्यादाखल देऊ असे म्हणत त्यांनी कुडाळ पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी भाजपा नेते निलेश राणे यांनी कालच्या घटनेत वैभव नाईक यांना हाकलून लावण्यात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीवर थाप मारत पुष्पगुच्छ देत सर्वांचा सत्कार केला.

भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली, सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, आनंद शिरवलकर, विशाल परब, मोहन सावंत, नगराध्यक्ष ओंकार तेली, आबा धडाम, बंड्या सावंत, सुनिल बांदेकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, महिला शहर अध्यक्षा सौ ममता चेतन धुरी, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील, संदेश नाईक, सतीश माडये, दिनेश शिंदे, निलेश परब, बाळा कुडाळकर, देवेन्द्र सामंत, चंदन कांबळी, विश्वास पांगुळ, अवधूत सामंत, तन्मय वालावकर, योगेश घाडी, वैभव परब, योगेश राऊळ, शैलेश दळवी, संदेश सुकळवाडकर, प्रितेश गुरव आदी पदाधिकारी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा