You are currently viewing निरोगी आरोग्यासाठी योगा आवश्यक – प्रा.एस.एन.पाटील

निरोगी आरोग्यासाठी योगा आवश्यक – प्रा.एस.एन.पाटील

वैभववाडी

इतर शारीरिक व्यायामाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वांनी नियमित योगा करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा.एस. एन.पाटील यांनी केले.

२१ जून २०२१ रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने वैभववाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मा.अतुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ७.३० ते ८.४५ या वेळेत योग प्राणायाम कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिन, योग, प्राणायाम आणि आयुर्वेद परंपरा, योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितलेले प्राणायामाचे प्रकार, विविध आसने यांची माहिती दिली. तसेच वॉर्मअप, ओम जप, प्राणायामाचे आठ प्रकार, सूक्ष्म व्यायाम व विविध आसने, प्राणायाम योगा कोणी करावा, कधी करावा, कोठे करावा तसेच त्यांचे फायदे याबाबत सविस्तर माहितीसह प्रात्यक्षिके सादर केली. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले छोटे मोठे आजार आणि कोरोना महामारीच्या काळात योग आणि प्राणायामाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

दिवसातील चोवीस तासांपैकी एक तास आरोग्यासाठी दिल्यास रोगमुक्त जीवन जगता येईल असे पतंजली योग समिती वैभववाडीचे सदस्य तथा योग शिक्षक प्रा. श्री एस. एन.पाटील यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक श्री.अतुल जाधव यांनी सर्वांनी नियमित योगा करावा आणि आपले आरोग्य उत्तम राखावे असे आवाहन केले. या योग प्राणायाम कार्यक्रमात वैभववाडी पोलीस स्टेशनचे बहुसंख्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शेवटी श्री.गणेश भोवड यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा