You are currently viewing राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आज वाढदिवस. एनएसयुआय पासून राजकिय वाटचाल सुरू केलेले अमित सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात समर्थपणे राष्ट्रवादीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन राष्ट्रवादीला पुन्हा एकदा राजकीय शिखराकडे घेऊन जाताना दिसत आहेत. जिल्ह्यातील रथी महारथी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी जिल्ह्यात बॅकफुटवर गेली होती, परंतु जिल्हा राष्ट्रवादीतील कुरबुरी मिटवून सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला एकसंध बांधण्याचे काम अमित सामंत यांनी केले आहे.
९० च्या दशकात जेव्हा शिवसेना मुंबईत जोमात होती तेव्हा काँग्रेसच्या एनएसयुआय संघटनेतून शिवसेनेच्या वादळापुढे सलग तीन वर्षे महाविद्यालयात यूआर म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांच्यासोबत विध्यार्थी दिशेपासून जे दोन खंदे समर्थक होते ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि अमित सामंत. पवार कुटुंबियांच्या अत्यंत विश्वासातील म्हणून ते सर्वज्ञात आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार पर्यंत सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. निष्ठावंत पवारप्रेमी असलेले अमित सामंत हे स्पष्टवक्ते असून अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.
राजकारणातील सर्वोच्च नेत्यांशी ते थेट संपर्क साधतात. राजकारणात कटुता, द्वेष भावना न बाळगता ते स्वच्छ राजकारण करतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. विचारांची लढाई विचाराने लढण्यास ते प्राधान्य देतात. अतिशय दांडगा लोकसंपर्क असल्याने जिल्हाभरात त्यांना मानणारा वर्ग आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यास यश मिळविले आहे.
प्रसिद्धीचा हव्यास नसणारे नेते क्वचितच सापडतात, त्यापैकीच एक म्हणजे अमित सामंत. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या चेहऱ्यावर पाहूनच त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाची जाणीव होते. विनाकारण आक्रमक होऊन तोंडाची वाफ घालविण्यापेक्षा स्वतःच्या कामातून, कार्यातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेते असतानाही पक्षाची महत्वाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने पवार साहेब अमित सामंत यांच्यावर सोपवत असतात. पक्षाचे महत्वाचे निर्णय होताना त्या प्रक्रियेत अमित सामंत हे सहभागी असतात. कित्येक दिग्गज पक्ष सोडून गेले परंतु पक्षाच्या स्थापनेपासून अमित सामंत हे पवारांचे शिलेदार म्हणून कार्यरत आहेत. पवारांचे जवळचे असूनही कधी त्यांनी बडेजाव दाखवला नाही. मातोश्रीवरही त्यांना थेट प्रवेश मिळतो. सिंधुदुर्गात जेव्हा राणेंनी सेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जिल्ह्यात आले होते, त्यावेळी शिवसैनिक सुदधा घाबरले असताना राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात उद्धव ठाकरे थांबले असता अमित सामंत यांनीच त्यांचे स्वागत केले होते.
अमित सामंत यांच्या विविधांगी गुणांमुळे ते पवार कुटुंबाचे विश्वासातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्व गुणामुळे, संघटन कौशल्यामुळेच त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याची जबाबदारी देत जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली आणि त्याही कसोटीवर अमित सामंत खरे उतरले.
अशा या राष्ट्रवादीच्या डॅशिंग नेत्याचा आज वाढदिवस… संवाद मिडियाकडून अमित सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा