भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे आव्हान ; शासन अपयशी ठरल्यानेच भाजपचे लक्षवेध आंदोलन
मालवण
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी १९९० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करताना पैशाची कमी जाणवू दिली नाही. चालू दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक मदत ही भाजप आणि राणे कुटुंबीयांनीच केली असून सत्ताधारी शिवसेनेने जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था डबघाईला आणण्याचे काम केले आहे. वैभव नाईक यांनी आवाहन केल्याप्रमाणे राणेसाहेब स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी ५० बेड मोफत उपलब्ध करून देतील, मात्र राणे साहेबांना असा सल्ला देणारे आमदार वैभव नाईक स्वतःच्या कै. विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वरूपात २५ जागा उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवतील का ? असा सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केला आहे.
भाजपच्या लक्षवेध आंदोलनावर आ. वैभव नाईक यांनी शुक्रवारी टीका करून भाजप नेते खा. नारायण राणे यांनी गरीब रुग्णांसाठी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ५० बेड मोफत उपलब्ध करून दयावेत, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आमदार वैभव नाईक यांनी स्वतःच्या फार्मसी कॉलेज मध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी किमान २५ जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवण्याचे प्रतिआव्हान दिले आहे.
भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आजपर्यंत अनेक विकासकामे स्वखर्चाने केली आहेत. पडवे येथील हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र राणेसाहेब कधीही इतरांप्रमाणे ढोल घेऊन त्याचा धिंढोरा पिटत नाहीत. कोरोनाच्या या दोन वर्षात राणे साहेब आणि भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या मदती एवढी मदत शिवसेना अथवा सत्ताधारी एकाही नेत्याने केली नाही. त्या उलट केंद्र सरकारने जे दिले, ते व्यवस्थित राखण्यात देखील शासन आणि प्रशासन अपयशी ठरले आहे. पीएम केअर फंडातून जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. मात्र देखभाली अभावी हे सर्व व्हेंटिलेटर बंद असून ते चालवण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे तंत्रज्ञ नाहीत. आरोग्य क्षेत्रातील अनेक पदे रिक्त आहेत.
कोरोना रुग्णांची ठिकठिकाणी गैरसोय होत आहे. भाजपच्या विधानपरिषद आमदारांच्या निधीतून मालवण मध्ये ३५ बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र जागा अनुपलब्धतेचे कारण दाखवून या कोविड सेंटरला आडकाठी आणली जात आहे. यासाठीच भाजपच्या वतीने शासनाचे आरोग्य क्षेत्राच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर टिका करण्यापूर्वी आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.
आमदारांनी निदान बिस्कीटपुडा तरी न्यावेत
आमदार वैभव नाईक सध्या गावोगावी सुरू असलेल्या ग्राम विलगीकरण कक्षाना भेटी देऊन फोटोसेशन करीत आहेत. या ग्राम विलगीकरण कक्षाच्या उभारणीत आमदारांचे अथवा त्यांच्या शासनाचे योगदान काय ? सर्व ठिकाणी उभारण्यात आलेल्या ग्रामविलगीकरण कक्षांना केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यात आला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फोटोसेशनसाठी जाताना निदान तेथे दाखल रुग्णांना साहित्य किंवा बिस्कीट पुडा तरी घेऊन जावे, असा टोला धोंडू चिंदरकर यांनी लगावला आहे.