You are currently viewing सिंधु आत्मनिर्भर अंतर्गत उद्या हळद बियाणे वाटप शुभारंभ

सिंधु आत्मनिर्भर अंतर्गत उद्या हळद बियाणे वाटप शुभारंभ

देवगड, मालवण, कुडाळ तालुक्यात होणार वाटप

लाभ घेण्याचे राजेंद्र म्हापसेकर यांचे आवाहन

ओरोस

‘सिंधु आत्मनिर्भर अभियान’ अंतर्गत ‘सिंधु हळद क्रांती मोहीम’ राबविण्यात येत आहे. १९ जून रोजी याचा शुभारंभ देवगड, मालवण व कुडाळ तालुक्यात करण्यात येत असून यावेळी हळद बियाणे वाटप शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी दिली. ‘सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या’ वतीने हळद क्रांती निर्माण करण्याच्या उद्देशाने हळद लागवडी साठी जिल्ह्यातील शेतकरी आणि उमेद अंतर्गत बचत गटांना सामूहिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करण्यासाठी बाजार भावापेक्षा अगदी स्वस्त दरात सेलम जातीचे हळद बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या बियाणे वाटपाचा शुभारंभ शनिवार 19 जून 2021 रोजी माजी मंत्री तथा आमदार रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि माजी आमदार राजन तेली, सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर, जि.प. अध्यक्ष संजना सावंत, जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आणि भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवार 19 जून 2021 सकाळी 10 वाजता पंचायत समिती, देवगड येथे माजी आमदार अजितराव गोगटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व सभापती पं.स. देवगड लक्ष्मण(रवी) पाळेकर, उपसभापती पं.स. देवगड रवींद्र तिर्लोटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी 1.30 वाजता पंचायत समिती, मालवण येथे जि.प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती धोंडी चिंदरकर, सभापती मालवण अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत हळद बियाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता ओरोस येथील गोविंद सुपर मार्केट( संतोष वालावलर कॉम्प्लेक्स) माजी जि.प. उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व जि.प. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कुडाळ सभापती नूतन आईर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

लक्षवेधी बियाणे केवळ 36 रुपये किलो दराने उपलब्ध करण्यात येणार असून किमान 30 किलो एकत्र बियाणे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे दिले जाणार आहे. लागवड संदर्भात सिंधू आत्मनिर्भर अभियान तर्फे कृषी तज्ञ मार्फत सतत मार्गदर्शन दिले जाणार आहे. या योजने अंतर्गत लागणारी खताची मध्यावधी मात्रा ही मोफत दिली जाणार आहे. लागवडी मधून तयार होणारी हळद विकायची असल्यास ‘सिंधु आत्मनिर्भर’ अभियानांतर्गत विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर, विश्वस्त प्रभाकर सावंत आणि भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार आहे. हळद बियाणे सामूहिक बचत गट तसेच शेतकऱ्यांनी नाव नोंदणी पंचायत समिती मध्ये अथवा ग्रामपंचायत मार्फत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा