You are currently viewing मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वी?

मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वी?

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उद्या (१७ जून) सायंकाळी ५ वाजता बैठक

 

कोल्हापूर येथे मराठा क्रांती मूक आंदोलन करत त्या माध्यमातून खासदार संभाजीराजे व मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारने दाखवला आहे. त्याअनुषंगाने मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या (१७ जून) सायंकाळी ५ वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे.

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या वर्षा निवासस्थान येथे बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार संभाजीराजे, राज्यमंत्री सतेज पाटील व मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक उपस्थित राहणार आहेत. या माहितीस संभाजीराजे यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून आज भर पावसात एल्गार पुकारण्यात आला. राजर्षी शाहू समाधी स्थळावर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी मूक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील असे तीन मंत्री या मूक आंदोलनात सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत व्यापक भूमिका मांडली. आम्हाला कुणाचे तरी काढून आरक्षण नको आहे, आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला न्याय हवा आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटवून द्यायला हवे. यासाठी कुठलाही एक माणूस ही लढाई लढू शकणार नाही, म्हणून संभाजीराजांना आता सर्वांनी ताकद द्यावी, अशी साद त्यांनी घातली. त्यानंतर सतेज पाटील यांनी सरकारच्या वतीने ग्वाही दिली.

आरक्षण मिळवून देण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. जे राज्याच्या पातळीवर शक्य आहे ते तातडीने दिले जाईल. याबाबत माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. संभाजीराजे यांनी दोन दिवसांत कधीही चर्चेला यावे असे त्यांनी म्हटले आहे, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सरकारचे हे चर्चेचे आमंत्रण संभाजीराजे यांनी स्वीकारले असून राज्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांना सोबत घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार ही भेट उद्या निश्चित झाली आहे. आता सर्वांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + five =