You are currently viewing भविष्यात हा गाव “पिवळे सोने पिकवणारा गाव”

भविष्यात हा गाव “पिवळे सोने पिकवणारा गाव”

समूह शेतीचा नवा पॅटर्न..

 

शेती बदलत आहे. पीक पद्धती सुद्धा बदलत आहे. गतवर्षीचा अनुभव पाठीशी ठेवत हळद हे ‘कॅश क्रॉप’ असल्याची खात्री पटल्याने गतवर्षी केवळ दोन किलो हळद लावणारा या गावातील शेतकरी यावर्षी दोनशे किलो हळद लागवड करत आहे.

कोरोनाने सर्व व्यवसायात सध्या बंधने आली आहेत. बंधने नाही आहेत ती फक्त शेती व्यवसायात! याची जाणीव झाल्यानेच मालवण तालुक्यातील पळसंब गावामध्ये समूह शेतीचा नवा पॅटर्न समोर येत असून तब्बल एक एकर शेतात हळदीची लागवड येथील शेतकऱ्यांनी आताच पूर्ण केली आहे. त्यामुळे भविष्यात हा गाव ‘पिवळे सोने’ पिकविणारा गाव ओळखला जाणार यात शंका नसावी.

गावातील हळद लागवडी विषयी गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या कडून माहिती घेतली असता ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हळद लागवडीकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. भगीरथ प्रतीष्ठान झाराप यानी पळसंब मध्ये ग्रामविकासाठी एक वर्षापूर्वीपासून काम करण्यास सुरुवात केलीआहे. गतवर्षी पळसंब मध्ये डॉ . प्रसाद देवधर यानी शेतकऱ्याना हळद पीक आणि इतर शेती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानी शेतकऱ्याना हळद पिकातून आर्थिक उन्नती साथा असे आवाहन करत हळद बियाणे सुद्धा उपलब्ध करून दिले. यानंतर सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या मागणीला सहकार्य करत मालवण तालूका कृषी अधिकारी श्री .गोसावी यांनी शासनाच्या मार्फत दोन हजार रोपे मोफत उपलब्ध करत शेतकऱ्याना प्रोत्साहन दिले. हळद लागवडीचा शुभारंभ झाल्यानंतर सुमारे ८०% शेतकऱ्यांनी हळद लागवड केली. गतवर्षी उत्तम पीक हाती आल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्याचा यशस्वी प्रयत्न शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने हळद बियाणे कोणताही वन्यप्राणी खात नाहि किंवा त्याची नासाडी करत नाही. त्यामुळे पिकाचे नुकसान अत्यल्प होते.

 

यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा निर्णय झाला आणि पळसंब बौद्धवाडी येथील शेतकरी श्री . राजाराम पळसंबकर , कमलाकर पळसंबकर , भिकाजी पळसंबकर , स्वप्नील पळसंबकर हे आपली जमीन लागवडी साठी देण्यास तयार झाले. त्यानंतर सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी पुढाकार घेत जमिन मालक आणि इतर शेतकरी यांच्यात यशस्वी बोलणी करत लागवड पूर्व मशागत, नांगरणी चालू केली. आचरा येथील श्री . माळकर याच्या कृषी केद्रातून आणि श्री अमोल माळगावकर याच्या कृषी केद्रातून अणि नांदगाव येथील कृषी केंद्रातून ७० रूपये कीलो दराने दोनशे कीलो हळद बियाणे आणि पंचवीस कीलो आले उपलब्ध करून दिले. प्रथमच गावच्या इतिहासात एक एकर एवढ्या क्षेत्रात मोठया प्रमाणात हळद लावण्याचा प्रयोग सामुहिक शेतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रमोद सावंत, दाजी जूवेकर ,स्वप्नील पळसंबकर, भिकाजी पळसंबकर , महेश पळसंबकर , हर्षदा गोलतकर , पल्लवी सावंत आदी शेतकरी पिवळे सोने पिकवण्यासाठी तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी पिकविण्यात आलेल्या हळदीवर प्रक्रिया करून हळद पूड करण्यात आली आहे. श्री दिपक नाखरे, रोशन चिचंवलकर यांच्या माध्यमातून आणि मुबईकर चाकरमान्याना विक्री करत आहेत.

 

पळसंब शेती संघ स्थापन करुन शेतकऱ्याची ताकद सुद्धा वाढली आहे. घराघरात हळद पीक घेणारा गाव म्हणून गावाने आपली ओळख निर्माण करावी.आज शेती करायची म्हणजे अपुरे मनुष्य बळ हा प्रमुख अडसर सर्वाना असतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यानी सामुहिक शेतीच्या माध्यमातून प्रगत शेतीकडे वळावे. सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सरपंच, भगीरथ प्रतिष्ठान,तालूका कृषी विभाग आपल्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे आहेत असे आवाहन सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी शेतकऱ्यांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =