वेंगुर्ला :
भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा वेतोबा पेट्रोलियम परुळेचे मालक, माजी सभापती निलेश सामंत यांच्या दानशूरपणाचे अनेक उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. त्यांच्या समाजकार्यात अजून एक दातृत्वाचे पान जुळले आहे. पाट हायस्कूल येथे म्हापण, कोचरा, निवती यांच्या संयुक्त रीत्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या सर्व रुग्णांची चहा नाष्ट्यांची जबाबदारी नीलेश सामंत यांनी स्विकारली आहे.
गेली कित्येक वर्षे त्यांचे समाजकार्य अविरहित सुरू आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक जणांचे फार मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांसाठी त्यांनी भाजपा पक्षाकडून मदत आणलीच पण आपण स्वतः सुद्धा नैतिकता जपत रोख रकमेची मदत नुकसानग्रस्तांना केली. दुःखित, पीडित, गरीब, गरजू, गुणवान विद्यार्थी, खेळाडू, कलाकार यांना मदत करणे असो किंवा सांस्कृतिक सोहळे, क्रीडा स्पर्धा असो ह्या सर्वंच बाबतीत आपल्या खिशात हात घालताना ते कधीच विचार करत नाहीत. अगदी मुक्तहस्ते ते दान करत असतात. या सर्व त्यांच्या गुणांमुळेच जनमाणसांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे व याच कारणामुळे जनमानसात त्यांना “दानशूर कर्ण” म्हणून ओळखले जाते. ‘महाभारतातील कर्णाकडे गेलेला कोणताही व्यक्ती जसा रिकाम्या हाताने कधी परत आला नाही तसाच निलेश सामंत यांच्याकडे गेलेली व्यक्ती कधी रिकाम्या हाताने परत येत नाही.’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठी हे एक वाक्य पुरेसे आहे. ते श्रीमंत आहेत म्हणून असं दान करू शकतात असे नाही त्यांच्याहून ही गडगंज संपत्ती असलेली माणसे आहेत पण मनाचा जो दिलदारपणा, मोठेपणा नीलेश सामंत यांच्याकडे आहे तो त्यांच्याकडे नाही म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अर्थातच असे दानशूर व्यक्तिमत्व घडण्यासाठी मनाची श्रीमंती महत्वाची. नायतर सगळं असुन पण रडत बसणाऱ्यांची समाजात काय कमी नाही.
जनसामान्य असो वा कोणताही मोठा प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडे सर्वांना आपुलकीची व आदराची वागणूक मिळते. ते कमी बोलतात पण जे बोलतात हे मोजके आणि सडेतोड असते. ते जरी भाजप जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करत असले तरी समाजकार्य किंवा एखादी मदत करताना ते पक्ष पाहत नाहीत. समाजकार्यात पक्षीय भेदभाव ते कधीच करत नाहीत. जिथे समाजाला गरज आहे तिथे ते नेहमीच उभे राहतात. आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे ही ते ठामपणे उभे राहतात. म्हणूनच भाजपचे सर्व कार्यकर्ते त्यांना गुरुस्थानी मानतात व त्यांची मदत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ते सर्वाधिक प्रिय नेते आहेत. नीलेश सामंत यांचे हे समाजकार्य बघून त्यांचा आदर्श घेऊन भविष्यातही असे नेते घडावेत हीच जनतेची रास्त अपेक्षा.
दरम्यान आज सकाळी भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष वेंगुर्ले प्रसाद पाटकर यांनी रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वॉटर हिटरचे वितरण केले. त्याच बरोबर रूग्णांना निलेश सामंत यांनी पुरस्कृत केलेले चहा-नाष्टा देण्यात आला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाट हायस्कूल कोविड सेंटरची पाहणी करून सर्व सुविधांची माहिती घेतली आणि रुग्णांना दिलासा दिला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तालुका वेंगुर्ले श्री प्रसाद पाटकर, भाजपा जिल्हा कार्यकारणी सहसचिव श्री विजय ठाकूर, भाजपा युवामोर्चा उपाध्यक्ष तालुका वेंगुर्ले श्री चंद्रकांत चव्हाण, भाजपा जिल्हा परिषद म्हापण विभाग बुथ प्रमुख तथा म्हापण माजी सरपंच श्री गुरुनाथ मडवळ, म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद चव्हाण, पाट हायस्कूल मुख्याध्यापक कोरे सर, शिक्षकेतर कर्मचारी श्रीधर चव्हाण व ग्रामस्थ सचीन चव्हाण उपस्थित होते.