You are currently viewing गड किल्ले संवर्धन संदर्भात सूचना पाठवा.

गड किल्ले संवर्धन संदर्भात सूचना पाठवा.

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे आवाहन.

वैभववाडी

नमस्कार सिंधुदुर्ग गिरीमित्रहो,
महाराष्ट्र राज्यातील तसेच जिल्ह्यातील किल्ल्यांचे जतन, संवर्धन विषयास अनुसरून मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील दुर्गप्रेमी आणि संस्था यांच्याशी दिनांक १३जून २०२१ रोजी झुम मिटिंग द्वारे संवाद साधला. या मिटींगमध्ये माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे पदाधिकारी तसेच काही दुर्गसंबधित संस्थांचे पदाधिकारी व दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर यांनी जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या वस्तुस्थितीची माहिती देऊन संवर्धन करण्याची विनंती केली. मा.मुख्यमंत्री साहेबांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन टप्प्याटप्प्याने केले जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये तोरणा, शिवनेरी, सुधागड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग असा पाच किल्ल्यांचा समावेश असल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील समावेश केलेल्या दोन किल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. ही आपल्या सर्व सिंधुदुर्गवाशीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्या बैठकीत त्यांनी गडकिल्ले संवर्धन संदर्भात आपले विचार व सूचना लवकरात लवकर पाठवण्याबाबत सूचना दिल्या. गिरिप्रेमी, दुर्गप्रेमींनी या दोन किल्ल्यांसह जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिनांक १९ जून पर्यंत शासनाच्या cmsankalpkaksha@ maharashtra.gov.in ईमेलवर पाठवाव्या. तसेच सदर ई-मेलची प्रत माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या masd.712021@gmail.com. या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. आपल्या सूचनांमध्ये व्यक्ती अथवा संस्थेचे नाव,पत्ता, ई-मेल आणि संपर्कासाठी एका जबाबदार व्यक्तिचा भ्रमणध्नी क्रमांक असावा. माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट व शिखर संस्था अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या दुर्गसंवर्धन समितीच्यावतीने आपल्या सुचनांचा पाठपुरावा करण्यात येईल.
जिल्ह्यातील दुर्गप्रेमी, गिरिप्रेमी संस्था यांनी शनिवार दिनांक १९ जून पर्यंत आपल्या सुचना दिलेल्या मेलवर पाठवाव्यात असे आवाहन श्री.प्रवीण कदम समन्वयक, गड संवर्धन समिती, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर (९१६८३४१६४४) व सचिव प्रा. श्री.एस.एन.पाटील (९८३४९८४४११) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा