बांदा
दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर गेली अनेक वर्ष १५जूनला नविन शैक्षणिक वर्षाच्या सत्राची सुरवात होते त्यामुळे १५जून हा शाळेचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी ,पालक व शिक्षक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळी सुट्टीनंतर बंद असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने या दिवशी फूलून जातात.
चालूवर्षी कोरोना अर्थात कोवीड १९ या विषाणूच्या प्रादूर्भावामुळे बंद असलेल्या शाळांची घंटा सलग दुसऱ्यावर्षी १५ जूनला वाजणार नाही त्यामुळे शालेय परिसर या दिवशी गजबजलेला दिसणार नाही.
शाळेचा पहिल्या दिवशी येणारा विद्यार्थी शाळेकडे आकर्षला जावा यासाठी दरवर्षी शालेय परिसराची आकर्षक सजावट करण्यात येते.पाना फुलांचे तोरण, रांगोळी यांनी शाळा आकर्षक बनविल्या जातात. या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत औंक्षण , गुलाबपुष्प, फुगे झाडांची रोपे आदि वस्तू देऊन काही ठिकाणी बैलगाडी, रिक्षा यात नवागत विद्यार्थ्यांना बसवून गावामधून मिरवणूक काढण्यात येते.या दिवशी शाळेतील सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश यांचे वाटप व दुपारच्या पोषण आहारात गोड धोड पदार्थांची मेजवाणी असते. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर वेगळा आनंद ओसांडून वाहत असतो. नवे दप्तर, वह्या, छत्री, रेनकोट, डबा, अशा गोष्टीसह आपल्या नव्या मित्र मैत्रिणींना भेटण्याची वेगळी उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये असते.
काही चिमुकली तर प्रथमतःच शाळेत नव्याने पाऊल टाकून शाळेत प्रवेश करत असतात, आई बाबा आपल्या सोबत नाहीत या विचाराने चिमुकल्यांना अश्रू रोखता येत नाहीत त्यांची समजूत काढताना शिक्षकांच्या नाकी
नऊ येते. गेली दिड दोन महिने आपल्यापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून शिक्षकांना सुध्दा वेगळा आनंद मिळत असतो. शाळेचा हा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी देखील जय्यत तयारी केलेली असते.
अशा प्रकारे दरवर्षी १५जून रोजी चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात येणारा हा दिवस या वर्षी कोवीड १९ या विषाणूमुळे बंद असलेल्या शाळांना अनुभवता येणार नाही. सध्या महाराष्ट्र राज्यासह भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणाच्या दुसर्या लाटेत अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे शाळा कधी चालू होतील याबाबत अनिश्चितता आहे.पुढील काळात सर्व काही सुरळीत होऊन शाळा नियमितपणे चालू होऊन शाळेची घंटा लवकरच वाजेल हिच अपेक्षा .
श्री जे.डी पाटील
जि .प. केंद्रशाळा बांदा नं .१ ता .सावंतवाडी