कासार्डे
राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील कुमार मेधांश सतीश मदभावे याने राज्यस्तरीय अभिव्यक्ती ज्युरी अवाॅर्ड प्राप्त केला आहे.
उमेद फौउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना जनजागृती ऑनलाईन अभिव्यक्ती स्पर्धा – २०२१ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यभरातून प्रचंड प्रमाणात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातून ३४४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.उमेद फौंडेशन यांच्या वतीने गरजू व निराधार मुलांसाठी लोकसहभागातून मायेचे घर उभारण्याचा उपक्रम साधला जात आहे. याची जनजागृती व्हावी यासाठी उमेद फाउंडेशनद्वारा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उमेद फाउंडेशनच्या वतीने उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि विजयी झालेल्या सर्वच स्पर्धकांचे कौतुक व अभिनंदन केले.
मेधांश मदभावे हा कणकवली तालुक्यातील हुंबरड येथील बी.एन. विजयकर इंटरनॅशन स्कूल या शाळेमध्ये पहिल्या यत्तेत शिकत असून त्याला चित्रकला, मूर्तिकला, अभिनय, वक्तृत्व, कम्प्युटर यामध्ये कार्यरत राहण्याचा विलक्षण छंद आहे. गतवर्षी त्याने स्वतःच्या घरातील सव्वा फुटाची गणेशमूर्ती ही वर्तमान पत्रांच्या कागदांचा लगदा तसेच नारळाचा काथा, कोरडा पालापाचोळा, शाडूची माती यांपासून निसर्गमैत्र (इकोफ्रेंडली) गणेशमूर्ती स्वरूपात बनवून रंगवली होती. वेगवेगळ्या स्पर्धातून त्याने नाट्य अभिव्यक्ति तसेच वेशभूषा साधून कौतुकास्पद यश मिळवलेले आहे. उमेद फाऊंडेशनच्या या अभिव्यक्ती स्पर्धेत त्याने कोरोना विषयावर ब्लॅक बेस स्क्रॅच ॲनिमेशन प्रोग्रामिंगच्या माध्यमातून संवाद चित्र साधून एका अनोख्या प्रयत्नाने कोरोनाचे दुष्परिणाम कथन करून कोरोनाच्या परिस्थितीच्या निवारणार्थ कार्यरत असणाऱ्या, कुटुंबापासून दूर असणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या मुलाबाळांची, कुटुंबांची व्यथा मांडली. उपाय योजनांचे काटेकोर पालन करून कोरोना टाळण्यासाठी प्रबोधन केले.मेघाशला बुरंबावडे येथील रीना दुदवडकर यांचे मार्गदर्शन लाभले. मेधांशच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो : मेधांश मदभावे