कोकणातील फळे आणि त्यांचे विविध आकार एक वैशिष्ट्य.
कोकण म्हणजे धरतीवरचा स्वर्गच… पाऊस संपून थंडी सुरू झाली की कोकणातील आंबा, काजू, फणस आदी फळांना बहर येतो. मोहरलेली झाडे पाहण्यास सुरेख दिसतातच परंतु त्या मोहराचा सुवास सुद्धा मन प्रसन्न करतो. कोकणात मुख्यतः आंबा, काजू, फणस, रतांबा, जांभुळ, करवंदे, अशी विविध फळे चाखायला मिळतात. जानेवारी नंतर आंबा, काजू, फणस मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दिसतात. फळांच्या जातीनुसार फळांचे आकार सुद्धा वेगवेगळे असतात. परंतु फणस हे असे फळ आहे जे बाहेरून काटेरी आवरण असून आतून मधाळ गोड कापे आणि रसाळ गरे असतात. फणसाचे आकार देखील वेगवेगळे असतात.
कसाल, वझरेवाडी, ता.कुडाळ येथील उत्तम परब यांच्या परसात असेच एका फणसाच्या झाडाला आलेल्या फळामध्ये चक्क गणपती गजाननाचे रूप प्रकट झाले आहे. या फळाचा आकार पाहता साक्षात गणेशाचेच दर्शन होत असल्याचे भासत आहे. फणसाच्या फळात श्री गणेशाचे दर्शन होत असल्याने आणि या फळाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक हौशी लोक, फोटोग्राफर, आदी फोटो काढण्यासाठी येत असून कित्येकजण गणेशाचे दर्शन घेऊन जात आहेत. श्री उत्तम परब यांच्या परसात फणसात गणेश दर्शन अनेकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.
उत्तम परब यांच्या बागेतील हा फणस अजून लहान आकारात आहे, त्यामुळे मोठा होऊन गणेश महाराजांचे कशाप्रकारे दर्शन होते हे देखील पाहणे औत्सुक्याचे आहे. मोठा झाल्यावर बदलणारा फणसाचा आकार, त्यात तयार होणारे गरे आणि पिकल्यावर फणस कापला जातो की कसे यावर देखील लोक फळातील गणेशाचे दर्शन घेतानाच बोलताना दिसतात. एकंदरीत कसाल येथील उत्तम परब यांच्या बागेत आलेला फणस आणि त्यातील गणेशाचे रूप हा आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय बनला आहे.