मालवण
तारकर्ली गावचा सुपुत्र आणि नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असणारा स्वप्निल गोविंद खराडे याने कोरोनाच्या काळात आपल्या जिल्ह्यातील आणि पर्यायाने आपल्या गावातील स्थिती कोरोनामुळे गंभीर झालेली आहे. गावागावात कोरोना वेगाने फैलावत आहे, प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परिस्थिती येऊन ओढवलेली आहे, जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये बेड देखील उपलब्ध नाहीत, अशावेळी आपल्या गावातील लोकांना कोरोनाच्या संकटांशी दोन हात करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी हव्या असतात त्या म्हणजे ताप येत असेल तर थर्मल गन, थर्मामिटर, ऑक्सिजन कमी जास्त होत असेल तर तपासण्यासाठी ऑक्सिमिटर, वाफ घेण्यासाठी स्टीमर, इत्यादी वस्तूंची आवश्यकता असते.
आपल्या गावातील लोकांची गरज ओळखून आणि गावाप्रति असलेल्या आपल्या प्रेमापोटी, कर्तव्य आणि गावचे ऋण फेडण्यासाठी म्हणून स्वप्निल खराडे यांनी आपल्या कमाईतून गावासाठी ५००० मास्क, ५ ऑक्सिमिटर, १० डिजिटल थर्मामिटर, ५ थर्मल गन, आणि १० स्टीमर आपल्या भावामार्फत दिले आहेत. स्वप्निल खराडे यांच्या या दातृत्वाबद्दल तारकर्ली येथील बंड्या पराडकर मित्रमंडळ आणि तारकर्ली ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले. गावाच्या बाहेर जाऊनही गाव संकटात असताना आपण परदेशी सुखरूप असून गावाची ओढ आणि गाववाल्यांची असलेली चिंता स्वप्निल यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.. त्यामुळे गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण देश परदेशात नोकऱ्या करतात, गावातील शाळांमधून शिकून मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत, अशा इतर जिल्हावासीय परदेशात असलेल्या तरुणांनी स्वप्नील खराडे यांचा आदर्श घेत जिल्ह्यातील आपल्या गावाला जरी मदत केली तरी कोरोनाच्या काळात ती मोलाचीच ठरणार आहे. परदेशी असणाऱ्या इतरांनी देखील स्वप्नील यांच्या पावलांवर पाऊल ठेवत गावासाठी जमेल ती मदत करावी आणि कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी, आपल्या गावकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास सहकार्य करावे.