You are currently viewing रुग्णवाहिका परत बोलावून अडवणूक केल्याने भाजपचे जि.प.भवनासमोर ठिय्या आंदोलन

रुग्णवाहिका परत बोलावून अडवणूक केल्याने भाजपचे जि.प.भवनासमोर ठिय्या आंदोलन

बांद्यात येणारी रुग्णवाहिका माघारी बोलावल्याने भाजप आक्रमक…

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची भितीदायक परिस्थिती आणि रेड झोनमधे गेलेला जिल्हा यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नी सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या बाराही रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍ पालकमंत्र्यांनी माघारी बोलाऊन केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याने भाजपाने मंगळवारी जि.प.भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत पालकमंत्र्यांच्या या कृतीबाबत तीव्र निषेध केला.

या आंदोलनात जिल्हातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. माजी जि.प. अध्यक्षा सरोज परब, सावंतवाडी सभापती निकीता सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रसंन्ना देसाई, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दिपक सुर्वे, संतोष गावकर, उपसभापती शितल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ला सरपंच जगंन्नाथ धुरी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, आडेली सोसा. चेअरमन समीर कुडाळकर, तात्या कोंडसकर, समीर गडेकर, भाऊ गडेकर, संदेश सुकळवाडकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

उद्घाटनाच्या श्रेयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी वाशीहून व आरोग्य केंद्रांच्या ताब्यात गेलेल्या अँम्ब्युलन्स जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत पुन्हा माघारी बोलावून घेतल्या. या रुग्णवाहिकांची गरज त्या त्या गावात असताना व कोरोनाने रुग्ण तडफडत असताना पालकमंत्र्यांच्या या कृतीबाबत तीव्र संताप उमटला. जिल्हाभरातून भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सिंधुनगरी येथे एकवटले व ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. तत्पूर्वी राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या या शिष्टमंडळाने जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची भेट घेत या रुग्णवाहिका तात्काळ त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात द्या अशी मागणीही केली.

खनिकर्म विभागाच्या निधीतून या ६ रूग्णवाहिका मान्य झाल्या असून पालकमंत्री व खनिकर्म विभागाकडून आदेश प्राप्त होताच सोडण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणांनी नगरी दुमदुमून गेली. प्रशासनाने तातडीने पोलिसांनाही पाचारण केले. कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाही अॅम्ब्युलन्स नागरिकांच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या अशा घोषणा देत कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी जीप प्रवेशद्वारावर ठाण मांडले.

जोपर्यंत अॅम्ब्युलन्स मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे या नेत्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पत्रकारांना फ्रंट वर्कर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पत्रकारांना कोरोना  लसीमध्ये प्राधान्यक्रम देत लसीकरण सुरू केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या दबावामुळे प्रशासनाने लसीकरण करण्यास आडकाठी सुरू केली त्याचे पडसाद या आंदोलनात उमटले.

प्रतिक्रिया व्यक्त करा