नि:शब्द एकांत

नि:शब्द एकांत

नि:शब्द एकांत
(मुक्त रचना)

आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..
बंद दरवाजा ,टेबल,खुर्ची , नि:शब्द एकांत..
संगे मैत्र पुस्तकांचे ! नित्य वाचतो लिहितो..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…१

आता न धाक अन दरारा माझाच कुणाला..
नाही त्रास माझ्या बुरसटलेल्या विचारांचा..
सारेच आता ! मुक्त , बेबंध स्वानंदात रमले..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…२

पुस्तके मुक्त बोलती ! गंधाळतात गतस्मृती..
अंतरी ओघळती मनभावनांच्या शब्दराशी..
एकांतात मी विणतो ! संवेदना कळ्यांच्या..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…३

बंद खोलीच्याच खिडक्या सताड़ उघड्या..
आवतरतो गवाक्षातुनी ! निसर्ग प्रसन्नतेचा..
तीच प्रसन्नता ! सुखद कुरवाळीते अंतराला..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…४

सांजरंगले क्षितीज सुखावते या बंद खोलीत..
पुन्हा जोपासतो नव्याने जीवनी जपलेले छंद..
जरी जीवन मर्त्य ! तरी स्मृती साऱ्या जीवंत..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…५

वृद्धत्वे नित्य जपावे साऱ्यांच्याच अंतरंगा..
त्यजुनिया अहंकारा ! निर्मोही तत्व जगावे..
जे लाभले ते सारेच ! मी मानतो दयाघनाचे..
आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…६

रचना:- ©वि.ग.सातपुते (भावकवी).

प्रतिक्रिया व्यक्त करा