मुख्यमंत्र्यांचे विश्वासक उद्गार..
संपादकीय…..
“वैभव, तुझ्यासाठी वाट्टेल ते आणि तू मागशील ते देणार” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत हे उद्गार… कुडाळ एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आमदार वैभव नाईक यांनी ऑक्सिजन प्लांट होण्यासाठी जी कठोर मेहनत घेतली त्याबद्दल गौरवोद्गार काढत आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या ऑक्सिजन प्लांटचे महत्व विशद करतानाच त्यांनी आमदार वैभव नाईक यांचे आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना त्यांनी घेतलेली मेहनत ही न भूतो न भविष्यती अशीच होती अशी पुष्टीही जोडली. वैभव नाईकांच्या जिल्ह्याप्रति असलेले प्रेमामुळे मुख्यमंत्री देखील भारावून गेले.
आमदार वैभव नाईक हे जिल्ह्यातील कोरोना निर्मूलनासाठी अहोरात्र झटत आहेत, दररोज जिल्हा रुग्णालयात जात तिथे असणाऱ्या अडीअडचणी समजून घेतात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. कोविड रुग्णांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात, त्यामुळे त्यांची जनातेप्रति असलेली धडपड दिसून येते. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी छोटीशी जरी अडचण त्यांना सांगितली तरी ते झटक्यात ती सोडवतात, त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याप्रती लोकांची आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.
ऑक्सिजन प्लांटच्या उदघाटन प्रसंगी जिल्ह्यात पहिली कोविड लॅब सुरू केल्याने वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे मुंबईतून आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास दोन लाख चाकरमानी दाखल झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्याला जास्तचा लसींचा पुरवठा करावा अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांना बोलताना मध्येच थांबवत हसतच मुख्यमंत्री म्हणाले, “अरे वैभव तुझ्यासाठी वाट्टेल ते, तू मागशील ते देणार, तू जोमाने काम करतो आहेस, तसेच करत रहा. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त कर, मला खात्री आहे माझा वैभव कुठेही कमी पडणार नाही. वैभव तू लाग कामाला मी आहे तुझ्या पाठीशी”. असे गौरवोद्गार काढत चक्क वैभव नाईकांच्या प्रत्येक मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वैभव नाईक यांच्या कामावर आणि त्यांच्यावर असलेला आपला विश्वास आज शब्दातून आणि आपल्या कृतीतून जाहीरपणे व्यक्त केला. त्यामुळे वैभव नाईक यांनी आपल्या कामातून मुख्यमंत्र्यांचे मन जिंकल्याचे दिसून आले.
वैभव नाईक कोकणचा ढाण्या वाघ. अनेक नेते तोंडाने बोलतात पण करत काहीच नाही. वायफळ बडबड न करता आपल्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे वैभव नाईकांसारखे नेते विरळच. आमदार वैभव नाईक कमी बोलतात, समोरच्याचे शांतपणे ऐकून घेतात आणि तात्काळ निर्णय घेऊन काम करतात ही त्यांची ख्याती. काम कमी आणि दुसऱ्यांवर टिकाच जास्त करायची नी सतत चर्चेत राहायची त्यांची वृत्ती नाही. समोरच्याच्या टीकेला शब्दातून उत्तर देऊन आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपल्या कृतीतून, आपल्या धडाकेबाज कामातून उत्तर देत ते टिकाकारांचं तोंड बंद करतात. राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे, राज्याचे दबंग नेते नारायण राणे यांचा पराभव करून ते आमदार झाले, परंतु आपले पाय जमिनीवरच ठेवत त्यांनी नेता म्हणून नव्हे तर जनतेने निवडून दिलेला जनसेवक कसा असावा याच जिवंत उदाहरण महाराष्ट्रासमोर उभं केलं आहे.