कुडाळ :
कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यामधील मोरे या गावामध्ये “हेल्पर्स फाॅर द हॅंडीकॅप” या संस्थेचा *”स्वप्ननगरी”* अपंग पुनर्वसन व मदत केंद्र आहे. दोनच दिवसापूर्वी या केंद्रांमधील २२ अपंग व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे जाहीर करण्यात आले आणि सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या संस्थेमधील सर्व अपंगांचे जेवण करणारे स्वयंपाकी देखील कोरोना पॉझिटिव आल्यामुळे सुमारे ३५ अपंग बांधवांच्या जेवणाचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला. माणगाव खोऱ्यातच असलेल्या “तपोवन” या संस्थेने तीन दिवसाकरता सर्व नाष्टा जेवण व अन्य बाबींची जबाबदारी स्वीकारली. मात्र पुढील आठ दिवस या सर्व अपंग बांधवांच्या जेवणाची जबाबदारी कशी पार पाडता जाईल या विचारात संस्थेचे पदाधिकारी होते.
ही बाब मोरे गावचे ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष *श्री.राजा धुरी* यांना समजताच त्यांनी तातडीने भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष *श्री.रणजित देसाई* यांच्याकडे ही समस्या मांडली. तातडीने *श्री.रणजीत देसाई, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री.रुपेश कानडे, माजी सभापती श्री.मोहन सावंत, श्री.राजा दूरी* यांनी या सर्वच्या सर्व ३५ अपंग बांधवांना पुढील आठ दिवस नाष्टा, जेवण इत्यादी साठी लागणारे सर्व साहित्य विकत घेऊन मोरे गावात भेट दिली. तसेच सदर संस्थेच्या नजीकच असलेल्या वाडीतील एका बचत गटाच्या महिलांकडे सर्व सामान सुपूर्द करुन दर दिवशी सकाळी दुपारी, संध्याकाळी व रात्री सर्व अपंग बांधवांच्या नाष्टा व जेवणाची सोय करण्यास सांगितले. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदत करण्यात येईल असा विश्वास दिला. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एका महत्त्वाच्या विषयाची तातडीने दखल घेऊन आवश्यक असणारी मदत केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.