You are currently viewing ” ….आणि धिरोदात्त डॉ. नसिमादिदि रडू लागल्या….”

” ….आणि धिरोदात्त डॉ. नसिमादिदि रडू लागल्या….”

काल ३१ मे माझ्या लग्नाचा वाढदिवस. सकाळी आँफिसमधली काम आटोपली.एका कोरोनाग्रस्त बंधूला थोडी किराणा मालाची मदत करण्याचे नियोजन करून घरी आलो.सध्याची परिस्थिती पहाता गेल्यावर्षी सारखी झोकून देऊन मदत करायला यावर्षी आर्थिक आणि मानसिकही मर्यादा आल्यात. मात्र जोडलेली संवेदनशील माणसं,सामाजिक भान असलेले काही कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आँनलाईन मदत करता येईल तेवढी करायची.
रात्रौ घरीच होतो.साडेआठ वाजता साहसच्या संस्थापक आणि हजारो अपंगांची सावली व माऊली आदरणीय डॉ. नसिमादिदींचा फोन आला.दिदी अतीशय भाऊक झाल्या होत्या.. अक्षरशः त्या फोनवर रडत होत्या… मला म्हणाल्या ” फार वाईट परिस्थिती आहे.स्वप्ननगरीतील माझे बावीसहून जास्त अपंग बांधव व भगिनी कोरोना पाँझिटीव्ह झालेत.त्यातील एकीची तब्येत गंभीर झाल्याने कोल्हापूरला हलवलयं.,नकुल मी यायचं म्हणते..त्यांना आता मदतीची गरज आहे..काय करायचं.काही सुचत नाही..”बोलताना दिदिंचा आवाज आणखीन कातरा झाला.मी दिदिना म्हणालो,”तुम्ही मुळीचं यायचं नाही. मला फक्त स्वप्ननगरीतील संपर्क नंबर द्या. माहिती घेतो आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू.मी तुम्हाला रात्री फोन करतो.मुळीच काळजी करू नका.” मी फोन ठेवला व स्वप्ननगरीतील एका व्यक्तीशी बोललो…पण त्या व्यक्तीकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मी पुन्हा दिदिंना सांगितले की मला तुमची परवानगी हवी.मी जरी साहसचा विश्वस्त असलो तरी तुमच्या नावाने समाजमाध्यमातून आवाहन करू.निश्चितच मार्ग सापडेल.रात्रौ दहा वाजता मी दिंदिच्या नांवाने जाहीर आवाहन केलं.धडाधड दिदिना आणि मलाही फोन यायला सुरुवात झाली.
आपल्या पत्रकारितेचा किंवा सोशल मिडीयाचा सदुपयोग करता येतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.दै.लोकमतचे पत्रकार आणि आमचे मित्र श्री अनंत जाधव.यांनी रात्रौ अकरा वाजता मा.पालकमंत्री, मा.खासदार विनायक राऊत आदीना फोन करून विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिलं.रातोरात सगळी यंत्रणा हलली.सकाळीच जिल्ह्य्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी मा.खलीपे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यपथक स्वप्ननगरीत दाखल झालं.औषधोपचार, आहार याची व्यवस्था झाली. आरोग्य खात्याचे कर्मचारी तैनात झाले.अलगीकरण स्वप्ननगरीतच तयार करून भयभीत झालेल्या अपंग कोरानाग्रस्थाना दिलासा मिळाला. मा.खासदारांनी दिदिना फोन करून धीर दिला.
समाजमाध्यमातून सकारात्मक उर्जा घेऊन काम केल्यास असेच सकारात्मक परिणाम मिळतात. ज्या नसिमादिदींने.स्वतः अपंग असूनही हजारो अपंगांच्या पंखाना उर्जा देण्याचे आणि त्यांना आत्मनिर्भर. करण्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं..नव्हे या वयातही त्या सतत कार्यरत आहेत.यापूर्वी त्यांना मी असं कधीच रडताना पाहिल नाही… पण ज्या मायेच्या उबदार सावलीत ही माणसं वाढलीत त्याना कोरोना झाला हे समजल्यावर त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकणे आणि काळजी वाटणे साहजिकच आहे.
आज सकाळीच जनशिक्षणमध्ये कार्यरत असलेल्या माझ्या सहकारी आणि एक संवेदनशील रिटायर्ड शिक्षिका सौ.अलका नारकर मँडम यांचा फोन आला.मँडम म्हणाल्या “पार्सेकर,मी आपली पोस्ट वाचली.काय मदतीची गरज आहे सांगा.त्यांना मी नसिमादिदींशी बोलायला सांगितले. मागच्या पहिल्या लाटेत अडकलेल्या परप्रांतीयांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सढळ हस्ते मदत केली होती.
मला आनंद या गोष्टीचा आहे..माझ्या विवाहाच्या वाढदिवस असा एका सकारात्मक कामाने आणि नव्या उमेदीने साजरा झाला.
अनंत जाधव यांच्या संवेदनशीलतेला,खासदार राऊत आणि पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन आरोग्य यंत्रणा कामाला लावली त्यांच्या तत्परतेला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा या आणिबाणीच्या परिस्थिती आरोग्य यंत्रणेत अहोरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी मा.खलीपे साहेब यानां व.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीचा हात देणाऱ्या सगळ्यांनाच सलाम…
...एँड.नकुल पार्सेकर.
..विश्वस्त -“साहस”कोल्हापूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा