You are currently viewing घरपोच सेवा देण्याचे अधिकार कोविड काळात मुख्याधिकारी, तहसीलदार यांना…

घरपोच सेवा देण्याचे अधिकार कोविड काळात मुख्याधिकारी, तहसीलदार यांना…

राज्य उत्पादन शुल्क खाते घरपोच दारू पुरवठ्याची परवानगी कशी देतं?

कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने उघडण्यास परवानगी असून उर्वरित काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास व हॉटेलना घरपोच पुरवठा करण्याची परवानगी दिलेली असून कृषी व घर दुरुस्ती साठी लागणाऱ्या सामानाच्या दुकानांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीत इतर सर्वच दुकाने बंद असताना सिंधुदुर्गात बार व दारू दुकानांना दारू घरपोच देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने परवानगी दिल्याचे बार मालकांचे म्हणणे आहे. परंतु शहरात नगरपालिका मुख्याधिकारी आणि तहसिलदार यांनाच कोविडच्या काळात घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्याचे अधिकार असताना राज्य उत्पादन शुल्क खाते बार व दारू दुकानांना घरपोच दारू पोचविण्याची परवानगी कशी काय देऊ शकते?
घरपोच दारूची सेवा दिली तर त्यांची नावे, तपशील बार कडे आहे काय? दारू पिण्याचा परवाना संबंधितांकडे आहे काय? असे अनेक प्रश्न दारू घरपोच दिल्यानंतर उभे राहतात, आणि कोविडच्या आजारात दारूपासून रुग्णांना धोका उत्पन्न होऊ शकण्याची सुद्धा भीती आहे, त्यामुळे घरपोच दारू पोचविण्याच्या परवानगी आणि पुरवठा याबाबत योग्य तो खुलासा व्हावा, संबंधित यंत्रणेला दारू घरपोच देण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क खाते देऊ शकते का? याची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक एक संकट कमी करण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क खाते नवनवीन समस्या निर्माण करत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी चोरटी वाहतूक रोखण्यापेक्षा संधीचा फायदा घेत लाखो रुपयांची दारू दरदिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे आणि त्याला देखील पाठबळ राज्य उत्पादन शुल्क खात्याचेच आहे.
गोव्यातून चोरट्या मार्गाने आलेलीच दारू राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मेहेरबानीवर बार आणि दारू दुकानवाले विना परवाना घरपोच देत आहेत, त्यामुळे घरोघरी, सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्यास मदतच होणार आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी, तहसिलदार, यांनी याची गंभीर दखल घेऊन घरपोच दारू पुरवठ्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा