तौक्ते चक्रीवादळ शमत नाही तोच बंगालच्या उपसागरावर यास चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केले असून भारतावर धडकण्याआधीच विध्वंस सुरु केला आहे. पश्चिम बंगालच्या नईहाटी आणि हालीशहरमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून बुधवारी वादळ आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे.
चक्रीवादळाची भीषणता पाहता उद्या सकाळी ८.३० वाजल्य़ापासून रात्री ७.४५ वाजेपर्र्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच मदत कार्यासाठी नौदल आणि हवाई दलाची विमाने तयार ठेवण्यात आली असून जवळपास ९० एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ५४ हजार अधिकारी आणि कर्मचारी, २ लाख पोलीस-होमगार्ड कर्मचारी, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर्व मिदनापूर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उत्तर परगणा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांना देखील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे.
कोलकाता, हावडा आणि हुगळी या शहरांमध्ये देखील चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल. ओडिशामधील जगतसिंहपूर, केंद्रापारा, भद्रक, बालासोर आणि पश्चिम बंगालमधल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातून जाताना हे वादळ टप्प्याटप्प्याने १५५ किमी प्रतितास, १६५ किमी प्रतितास आणि शेवटी १८५ किमी प्रतितास वेग धारण करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर इतर राज्यात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४१.८ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.