गावातील सुमारे ३० कुटुंबांना पाण्याचा पुरवठा…
चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागातील वीज पुरवठाही खंडित असल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यात काल कोळंब, सर्जेकोट गावातील भेटी दरम्यान आमदार वैभव नाईक यांना ही बाब निदर्शनास येताच काल त्यांनी तातडीने पाण्याचा टँकर गावात उपलब्ध करून देत ग्रामस्थांना पाण्याची सोय केली.
किनारपट्टी भागातील सर्जेकोट गावास उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली. काही ग्रामस्थांना पाणी विकत घेणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. आमदार वैभव नाईक यांनी कोळंब, सर्जेकोट गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ग्रामपंचायत सदस्या भारती आडकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार काल आम. नाईक यांनी सर्जेकोट गावात टँकर उपलब्ध करून देत सीमादेवी, पारवाडीतील सुमारे तीस कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. काही वाडीत अरुंद रस्त्यामुळे पाणी उपलब्ध करून देणे अडचणीचे भासत असल्याने त्या वाडीतील ग्रामस्थांना बॅरल मधून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.