You are currently viewing पंचनाम्यातील अत्यल्प रकमेची आकडेवारी पाहून ‘ही घर मालकाला वर्गणी देताय का? आमदार नितेश राणे यांचा संतप्त सवाल

पंचनाम्यातील अत्यल्प रकमेची आकडेवारी पाहून ‘ही घर मालकाला वर्गणी देताय का? आमदार नितेश राणे यांचा संतप्त सवाल

तुमच्या खात्यावर भरपाई मिळेपर्यंत माझा सरकार विरोधात संघर्ष सुरूच असेल-आमदार नितेश राणे यांचे नुकसानग्रस्तांना आश्वासन

तालुक्यातील नाधवडे, वैभववाडी,करुळ, अरुळे, सडूरे व कुर्ली गावांमध्ये जाऊन नुकसानीची केली पाहणी

वैभववाडी
तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीमधील गावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या वादळात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत कोणताही आक्षेप नाही. परंतु घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि पंचनाम्यामधील नुकसानीचे आकडे खुपच नगण्य आहेत. अशा प्रकारच्या पंचनाम्यांना आमचा तीव्र विरोध आहे. असे पंचनामे खपवून घेणार नाही. ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना चांगली भरपाई मिळालीच पाहिजे. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर. पण भरपाई मिळवून देणारच अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी पाहणी दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार नितेश राणे यांनी तालुक्यातील नाधवडे, वैभववाडी, करुळ, अरुळे, सडूरे व कुर्ली गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. पहाणी केलेल्या प्रत्येक घरासमोर संबंधित यंत्रणेतील अधिका-यांना उभे करत आढावा घेतला. पंचनामा केलेल्या यादीतील पाचशे व सातशे रु. चे आकडे पाहून आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. ही घर मालकाला वर्गणी देताय का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. नुकसानीचे सर्व आकडे वाढवून द्या. अशा सूचना त्यांनी तहसीलदार रामदास झळके व संबंधित यंत्रणेला केल्या. पंचनाम्याची सुधारित यादी त्वरित प्रशासनाकडे सादर करा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सुधारित यादी करून घेतो. तुमच्या खात्यावर भरपाई मिळेपर्यंत माझा सरकार विरोधात संघर्ष सुरूच असेल असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी नुकसानग्रस्तांना दिले आहे. जि प सदस्य सुधीर नकाशे, करूळ येथील रवींद्र सरफरे, गजानन पाटील सडूरे तेथील केशव बाणे, सुतार,जंगम तसेच अरुळे, व कुर्ली मधील घरांची त्यांनी पाहणी केली.

 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, बाळा हरयाण, बँक संचालक गुलाबराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर, सरपंच आदिती नारकर, बाळू कांबळे, बाबा कोकाटे, प्रकाश पाटील, रितेश सुतार, सरपंच उज्वल नारकर, सडूरे शिराळे ग्रा.प.सदस्य नवलराज काळे, संजय सावंत, प्राची तावडे, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वीज वितरण अधिकारी श्री. सूर्यवंशी, आनंदा चव्हाण, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, उदय पांचाळ, संजय नकाशे, श्रीरंग पावस्कर, अंबाजी हुंबे, सुरज तावडे, मंडळ अधिकारी पावसकर, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर व ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी, कोतवाल व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा