ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी.
वैभववाडी.
घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे घाटरस्ते आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता करूळ घाट, भुईबावडा घाट, फोंडा घाट व आंबोली घाट हे महत्त्वाचे घाटरस्ते आहेत. त्यापैकी करुळ आणि भुईबावडा घाट हे कोल्हापूर-वैभवाडी यांना जोडणारे घाटरस्ते सध्या असुरक्षित असून
घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत तर, संरक्षण कठडे ढासळलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी या घाटांची आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
कोकणातील प्रमुख घाटरस्त्यांपैकी दुवा मानला जाणारा घाट रस्ता म्हणजे भुईबावडा. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या घाट रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते. घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट संभावना आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग घाटमार्गाच्या देखभाल, दुरूस्ती करण्याऐवजी पडलेल्या दरडी हटविण्यातच धन्यता मानताना दिसत आहे.
करुळ व भुईबावडा घाट हे दोन घाटमार्ग पावसाळ्यात ‘डेंजरझोन’ बनतात. विशेषतः भुईबावडा घाट तर पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक बनतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारे महत्वपूर्ण घाटमार्ग म्हणून यांची ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की, भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू होतात हा इतिहास आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यांवर मोठमोठया दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाटमार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक वाटू लागले आहेत.
दरवर्षी पावसाळा आला की, या घाटांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो.पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाट गेल्या काही वर्षापासून पावसाळी काळात अत्यंत धोकादायक बनले आहेत. दोन्हीही घाटात धोकादायक वळणे आहेत. संरक्षण कठडे देखील ढासळले आहेत. पावसाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्याठिकाणी संरक्षण जाळी बसवणे व धोकादायक वळणे हटविणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी ग्राहकांकडून होत आहे.
या घाट रस्त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी वर्षाला काही लाखो रुपये खर्च होत असतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा.कार्यकारी अभियंता तथा या घाट रस्त्यांचे पालक या नात्याने आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी वजा विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंके व संघटक श्री.जितेंद्र पिसे यांनी मेलव्दारे केली आहे.
=======================