दबंग नगराध्यक्ष संजू परब
विशेष संपादकीय…..
सावंतवाडी तालुक्यात मटका जोरदार सुरू होता. हाल मे खुशाल याच प्रमाणे कोरोनाच्या संकटातही मटका टपरी, गाडे, आणि अगदी फोनवरही दरमजल करत जोरदार मुसंडी मारत होता. संध्याकाळी सहा वाजता तर कधी संध्याकाळी ७ वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असो, या आदेशांची पायमल्ली करत फक्त मटक्यासाठीच खोललेल्या या टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या. मटक्याला लॉकडाऊन मुळी नव्हतंच. अगदी सुशेगाद सुरू असलेल्या मटक्यावर पहिला घाव घातला तो सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी…..!
माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे सुद्धा सावंतवाडीचे नगराध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री होते, परंतु सावंतवाडीतील मटक्याच्या अर्थकारणावर त्यांनी कधी एवढी कठोर भूमिका घेत घाव घातला नव्हता. त्यांची भूमिका हा कायम शांततेची आणि मवाळ असायची. परंतु संजू परब नगराध्यक्ष झाल्यावर सावंतवाडी शहरात वाढलेले गोवा बनावटीच्या दारूचे अवैध धंदे, जागोजागी उभ्या राहणाऱ्या मटकावाल्यांच्या टपऱ्या यामुळे शहराची बदनामी होत होती. विरोधकांनी सुद्धा संजू परब यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कंपूचे अवैध्य धंदे, सहकाऱ्यांचे उद्योग यावर उघडपणे तोंडसुख घ्यायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर सावंतवाडीत नव्याने सुरू होणाऱ्या मटका कंपनीला मार्केटमध्ये शिरण्यास वाव मिळत नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर संजू परब यांनी पोलिसांना लक्ष्य केलं. सावंतवाडीतील अवैद्य दारू धंदे आणि मटका, जुगार तात्काळ बंद न केल्यास सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना दारूच्या बाटल्या कुरियर करणार अशी सरळ सरळ धमकीच दिली होती. त्यामुळे आजपर्यंत कधीही मटक्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात न झालेली कारवाई पहिल्यांदाच सावंतवाडीत झाली. मटक्यावर कारवाई करण्यासाठी कठोर भूमिका घेताना संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांचाही मुलाहिजा न ठेवता जिल्हा पोलिस प्रमुखांना सरसकट सर्वांवर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे सावंतवाडी शहरात संजू परब यांच्या भूमिकेचे सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
नगराध्यक्ष केसरकर असो वा साळगावकर, आमदार दळवी असो वा तेली सर्वांनी आपापल्या पक्षातून सावंतवाडीचे नेतृत्व केले. परंतु आजपर्यंत अशी कारवाई करण्यात आली नव्हती. मटक्याच्या अर्थकारणावर सावंतवाडीतील जवळपास ५०० कुटुंब अवलंबून आहेत. बऱ्याच जणांचे घरसंसार सुद्धा रोज लावल्या जाणाऱ्या मटक्यावर चालतात. बाजारपेठेत सर्वसामान्य विक्री व्यवसाय करणाऱ्या काही बाया सुद्धा दहा वीस रुपयांच्या मटक्याचा आधार घेतात, इथपासून ते हजारो रुपये रोजच्यारोज मटका लावणारे सुद्धा काही महाभाग आहेत. त्यामुळे दरदिवशी मटक्याची लाखो रुपयांची उलाढाल होते आणि त्याच प्रमाणात हफ्ता सुद्धा बांधलेला असतो. मटका किती लोक खेळतात, याचबरोबर मटक्याच्या उद्योगामुळे अवैद्य असला तरी,अनेकांना रोजगारही उपलब्ध आहे. कित्येक बेरोजगार पान टपऱ्या, बिस्कीट, फरसाण नावासाठी विक्री करून मटक्याच्या जीवावर बेरोजगार या प्रमाणपत्रातून शेरा खोडून रोजगार मिळवून जगत आहेत.
मटका खेळून त्यातले ज्ञान नसणारे भिकारी सुद्धा झाले असतील परंतु त्याच्या कितीतरी पटीत जास्त कुटुंबांचे पालनपोषण मात्र मटका उद्योग करतो आहे. बेरोजगार असणारे कितीतरी लोक मटका लावून आपली रोजीरोटी चालवत आहेत. मटका कित्येकांसाठी तारणहार ठरला आहे. त्यामुळे मटकाकींग जरी कितीही गडगंज झाले तरी मटका बंद करण्याची मागणी सर्वसामान्य स्तरावरून होत नव्हती किंवा कुठल्याही आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी मटक्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आदेश काढले नव्हते.
संजू परब यांच्या इशाऱ्यानंतर वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्याने दारू, जुगार, मटका यासारख्या अवैद्य धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू झाली. अनेकांना मुद्देमाल सहीत अटक झाली. त्यामुळे मटक्यावर जीवनमान अवलंबून असणाऱ्यांची मात्र हालत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक कुटुंबावर, स्टॉल, टपरिवाल्यांवर उपासमारीचीही वेळ येईल. त्यामुळे मटक्यावर अवलंबून असणाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.
संजू परब यांच्या कठोर भूमिकेमुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी देखील अवैद्य धंद्यांवर हातोडा उगारलेला आहेच. या हातोड्याच्या घावातून गोवा बनावटीच्या दारूचे अवैद्य धंदे करणारे व स्वतःच्या परमिट रूममधून भेसळयुक्त दारू विक्री करणारे कोण कोण गजाआड जातात?
निर्माण भुवन जवळ स्विफ्ट गाड्या लावून दररोज कोवळ्या पोरांना घेऊन मीटिंग लावणारे कोण पकडले जातात?
मटक्याच्या जीवावर कुबेराचं ऐश्वर्य भोगणाऱ्या अजून कोणाची धरपकड होते?
विजयदुर्ग, फणसगाव पासून दोडामार्ग पर्यंत जुगारांच्या तकशीम बसवणारे कोण कोण घायाळ होतात हे लवकरच समजून येईल. आणि तेव्हाच संजू परब यांनी केलेल्या उठावाचे खरे चीज होईल…