You are currently viewing देवगड तालुका सिंधुदुर्गात येत नाही का?

देवगड तालुका सिंधुदुर्गात येत नाही का?

देवगड भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी का फिरवली देवगडकडे पाठ ?

देवगड

तौक्ती वादळाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केवळ चिवला बिचची पाहणी केली. सर्वाधिक हानी झालेल्या देवगड तालुक्याकडे मुख्यमंत्री फिरकलेही नाहीत. देवगड तालुका सिंधुदुर्गात येत नाही का? असा संतप्त सवाल देवगड भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली यांनी केला आहे.

मुख्यमंत्री वादळग्रस्तांची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्गात येत असल्यामुळे देवगडवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर देवगडवासीय आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदारांच्या नुकसानीची कल्पना त्यांना आली असती. पण हाऊस आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या देवगड तालुक्याकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. आज घडीला शासकीय आकडेवारी 2 कोटीहून अधिक नुकसानीचा अंदाज वर्तवत असली तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे शिल्लक आहेत. गळून पडलेला आंबा आणि मोडलेली आंबा कलमे यांचे पंचनामे होत आहेत. परंतु वादळात मुळापासून हलल्यामुळे पुढील काही काळात कमजोर होऊन नापीक होणाऱ्या हापूस कलमांचे नुकसान कशात मोजणार? असा सवालही डॉ.तेली यांनी उपस्थित केला.

तौक्ती वादळात देवगडमधील मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 4 खलाशी मृत आहेत. एवढी अपरिमित हानी होऊनही देवगड तालुक्याकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. देवगड तालुका सिंधुदुर्गात येत नाही का? असा संतप्त सवाल डॉ. अमोल तेली यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा