You are currently viewing ३ तासाचे हॉलिडे पॅकेज घेतल्यासारखे नुकसानीची पाहणी

३ तासाचे हॉलिडे पॅकेज घेतल्यासारखे नुकसानीची पाहणी

मुख्यमंत्री ठाकरे यांची निव्वळ नौटंकी – आ. नितेश राणे

सिंधुदूर्ग :

 

जिल्हात मच्छिमार, बागायत दार, यांच्या सह वादळात सापडलेली जनता नुकसानी मुळे हवालदिल झालेली आहे. लाखोंच्या नुकसानीचे पंचनामे ५०० आणि २०हजार रुपये होत आहे. जनतेच्या जखमेवर मीठ चोळत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फसव्या दौऱ्याचा सिंधुदुर्ग वाशीयांच्या आणि भाजपाच्या वतीने आपण निषेध करतो, अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यटक म्हणून नुकसान न झालेल्या चिवला बीचवर पाहणी करून गेले. जिथे नुकसान झाले त्या भागाची पाहणी न करताच परतले. अवघ्या ३ तासांच्या दौऱ्यात केवळ ६ की.मी.पाहणी करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदुर्गसह अवघ्या कोकणाची कुचेष्टा केली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात सलग ३ दिवस नुकसानीची पाहणी दौरा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अवघ्या ३ तासांत झलक दाखवणारे मुख्यमंत्री यातून आता कोकणचे कैवारी कोण हे जनतेनेच ठरवावे असे आमदार नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ती वादळाच्या नुकसानीचा सिंधुदुर्गात केलेल्या धावत्या दौऱ्याचा भाजपा आमदार नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. नियोजित निवती आणि वायरी भागाचा दौरा आयत्या वेळी बदलून चिवला बीचवर राणेंच्या बंगल्याचे नुकसान तर झाले नाही ना ? याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते काय ? असा खोचक सवालही आमदार नितेश राणे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी सलग ३ दिवस ७०० की.मी.चा प्रवास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार, शेतकरी, मच्छीमार , नुकसानग्रस्त ग्रामस्थ यांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना जाग आली आणि ते मातोश्रीबाहेर पडले.

अवघ्या ३ तासांचे हॉलिडे पॅकेज घेतल्यासारखे नुकसानीची पाहणी करण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांनी निव्वळ नौटंकी केल्याची सडकून टीका आमदार नितेश राणे यांनी केली. केवळ स्वतःचा अहंकार जोपासण्यासाठी अवघ्या ३ तासांचा दौरा केला. केवळ ६ की.मी. परिसरातील पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गसह कोकणवासीयांचा अपमान करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे नितेश राणे म्हणाले.एकीकडे ५ लाखांचे नुकसान जेथे झालेले असेल तेथे पंचनाम्यात फक्त २ लाख नुकसान दाखवले जातेय. हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई देताना १ झाडामागे केवळ ५०० रुपये नुकसानभरपाई देऊन कुचेष्टा करत आहेत. सिंधुदुर्गवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. पण इथे मात्र २ दिवसांत नुकसानीचा अहवाल माझ्याकडे आल्यानंतर निर्णय जाहीर करेन, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासीयांची सरळ सरळ फसवणूक केली आहे. भाजपाच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत असल्याचे आ.नितेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =