You are currently viewing ‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

वैभववाडी.

आपण सर्वजण मार्च २०२० पासून कोरोना महामारीशी सामना करीत असतानाच गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी ‘तोक्ते’ चक्रीवादळरुपी नैसर्गिक आपत्तीने खूप मोठी जीवित आणि वित्त हानी झालेली आहे. या चक्रीवादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणपट्टीला बसला आहे. यामध्ये काही कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची सविस्तर चौकशी आणि सर्वे होऊन नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य भरपाई देण्यात यावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सुमारे ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यामध्ये घरे, गुरांचे गोठे, झाडे, शाळा इमारती, शासकीय इमारती, मासेमारी जहाजे, सभागृहे तसेच महावितरण कंपनीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यासह कोकण विभागात झालेल्या नुकसानीचा जिल्हा, तालुका व गावनिहाय सर्वे होऊन नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळायला हवी.
मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या नैसर्गिक आपत्तीने कंबरडेच मोडले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने नुकसानग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, उपाध्यक्ष श्री‌.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत मा.उदय सामंत, पालकमंत्री सिंधुदुर्ग, मा.के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व डॉ.विजय लाड, राज्य अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा