आमदार वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन केले स्वागत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन वीज वितरणचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत पोल वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून वीजवितरणचे लाईनमन, इंजिनिअर, ठेकेदार गॅंग असे ५०० हुन अधिक कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. कणकवली वीज वितरण कार्यालय येथे आमदार वैभव नाईक यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.
कुडाळ व मालवण शहरातील बहुतांश वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काम पूर्ण झाले नसल्याने वीज पुरवठा सुरु झालेला नाही. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या मागणीवरून मालवण तालुक्यात यातील २०० कर्मचारी तर कुडाळ तालुक्यात १०० कर्मचारी देण्यात येणार आहेत. तसेच ठेकेदारांच्या प्रत्येकी ६ गॅंग दोन्ही तालुक्यात दिल्या जाणार आहेत. कुडाळ व मालवण या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ३०० लोखंडी पोल उपलब्ध करण्यात आले आहेत. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.