You are currently viewing तेरेखोल खाडीपात्रातील तो मृतदेह गोव्यातील महिलेचा

तेरेखोल खाडीपात्रातील तो मृतदेह गोव्यातील महिलेचा

सावंतवाडी

तेरेखोल खाडी पात्रात किनाऱ्याजवळ किनळे ख्रिश्चनवाडी येथे मंगळवारी अनोळखी मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह गोवा पेडणे येथील विमल जनार्दन पटेकर (५२) नामक महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या भावाने तिची ओळख पटवली आहे. ही महिला बेपत्ता असलेबाबत १५ मे रोजी पेडणे पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती.
किनळे ख्रिश्चनवाडी येथील श्रीम. वायोलेट पिटर डिसोजा यांचे घराजवळ मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास हा एक अनोळखी मृतदेह निदर्शनास आला होता. या मृत व्यक्तीच्या शरीराचा बराचसा भाग जलचारांनी खाल्लेला असल्याने सदरचा मृतदेह स्त्री किंवा पुरुष जातीचा तसेच संबधित व्यक्तीचे वय समजून येत नव्हते. विशेष म्हणजे सदरच्या मृतदेहावर कपडे नसून दोन्ही कानामध्ये वरील बाजूला पिवळसर धातूच्या रींगा होत्या. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे मुश्कील झाले होते. यासाठी आपल्या निदर्शनास कुणी व्यक्ती हरवली असल्यास सावंतवाडी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता या मृतदेहाची ओळख पटल्याने आता हा मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा