You are currently viewing सरकारकडे पैसेच नाहीत तर पंचनामे करण्याचा भपकेपणा तरी कशासाठी??

सरकारकडे पैसेच नाहीत तर पंचनामे करण्याचा भपकेपणा तरी कशासाठी??

 

आमदार नितेश राणे यांचा संतप्त सवाल

 

सिंधुदूर्ग :

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अश्यातच मुख्यमंत्र्यांनी मागच्या निसर्ग चक्रीवादळावेळी जी २५ कोटीची मदत जाहीर केली ती अजून का दिली नाही ? याचेही उत्तर आता त्यांनी द्यावे. तसेच या वेळच्या चक्रीवादळाच्या पंचनाम्याची भपकेगिरी करून सरळ सरळ जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारकडून आता लोकांनी  अपेक्षा तरी काय ठेवायच्या?

पालकमंत्री, आमदार व खासदार यांच्यात दमडीही आणण्याची कुवत नाही असेच या वरुन सिद्ध होते. सिंधुदुर्गवाशियांची सरळ सरळ प्रत्येक गोष्टीमध्ये फसवणूक सुरू आहे. खासदार मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेट मधले असताना ही सिंधुदुर्गाची अशी परवड कशी ?  कोविडच्या लसीकरणास देखील जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोटा उपलब्ध नाही? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.

आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी “जिल्ह्यातील जनतेची मात्र अशी कोणतीही फसवणूक आम्ही व्हायला देणार नाही,” असा इशाराही दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकार सोबत जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार खासदारांवर टीकास्त्र सोडले.  मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार अशी घोषणा केली तसेच २५ हजार रुपये हेक्टरी भात नुकसानीचे देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र घोषणा करुन १ रुपयाही देत नाहीत अशी टीका नितेश राणे यांनी केली. सिंधुदुर्गातील जनतेसाठी केव्हाही रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहिले नाही परंतु कोविडमुळे सध्या आंदोलन करणे ची स्थिती नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांबाबत भाजपाच्या वतीने राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचे ही राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेची अत्यंत हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती राहिली तर जिल्ह्यात आत्महत्या सुरू होतील .चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कणकवली मतदार संघातील तीनही तहसीलदार, महावितरण यांच्या मी संपर्कात असून, त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी जाहीर केलेला मच्छिमारांना डिझेलचा परतावा मिळाला नाही. या वादळामुळे मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री पैसे आणू शकत नाहीत. जर सरकारकडे पैसेच नाहीत तर पंचनामे करण्याचा भपकेपणा तरी कशासाठी ? जर भाजपचे सरकार असते तर आम्ही निश्चित जनतेला वाऱ्यावर सोडले नसते. असे राणे यांनी म्हटले आहे. भाजप सोडून जिल्ह्यात कोण काम करतोय ? असाही सवाल राणे यांनी केला.

मास्क, पीपीई कीट आदी अनेक सुविधा रुग्णांना मी पुरवठा करत आहे. माझ्यासोबत निवडणुकीत स्पर्धा करणाऱ्यांनी यातही स्पर्धा करावी आणि या स्पर्धेमध्ये जर माझ्या पुढे कोण जात असेल तरी चालेल. मला आनंद होईल, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य फोडण्याकरिता २५ लाख देणारे आता कुठे गेले ? आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या गंभीर परिस्थितीत जनतेसाठी का वापरले नाहीत असा सवालही राणे यांनी केला. या राज्य सरकारकडून आता जनतेची कोणतीच अपेक्षा राहिली नाही. आणि त्याचा उपयोग तरी काय होणार आहे म्हणा? असा सवाल राणे यांनी केला.

सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या शरीराचं वजन वाढविण्यापेक्षा मंत्रीमंडळात त्यांचे असलेले वजन सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना नुकसानभरपाई देत दाखवून द्यावे, असा टोलाही त्यांनी हाणला. तसेच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका करून प्रसिद्धी घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे असलेले वजन दाखवून द्यावे. तसेच जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट नुसते उभारून चालत नाही ते प्रत्यक्षात चालू कुठे झाले? एक तरी चालू झाले असेल तर दाखवावे असेही ते म्हणाले. जिल्ह्यात लाईफ टाईम हॉस्पिटल ला अजून 300 कोविड रुग्णाना बेड वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असून कोविड रुग्णांना खाजगी मेडिकलमधून औषधे आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जाते. याबाबत राणे यांचे लक्ष वेधले असता याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशीही चर्चा करण्यात येईल असेल राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा