You are currently viewing दिविजा वृद्धाश्रमाच्या हाकेला उमेद फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची साद

दिविजा वृद्धाश्रमाच्या हाकेला उमेद फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची साद

असलदे येथील वृद्धाश्रमाला सुमारे २० हजार रुपयांची मदत

कणकवली
गेल्या वर्षभरापासून कोरोना परिस्थितीमुळे सामाजिक स्थिती बिघडत चालली असताना वृद्धाश्रमांना सुद्धा याचा फार मोठा फटका बसत आहे. वृद्धाश्रमातील सर्वच कार्यक्रम बंद झाल्याने आजी-आजोबा एकाकी पडले आहेत तसेच वृद्धाश्रमाला मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा टंचाई भासत असल्यामुळे संस्थाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम या संस्थेचे ट्रस्टी श्रीम. दीपिका रांबाडे आणि इतर सदस्य यांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांना मदतीसाठी हाक दिली होती. आणि याच हाकेला साद म्हणून उमेद फाउंडेशनने तात्काळ जीवनावश्यक वस्तूंची मदत दिविजा वृद्धाश्रमाकडे पोहोच केली.
उमेद फाऊंडेशन सातत्याने सिंधुदुर्गातील गरीब,वंचित मुलांच्या शिक्षणासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोश्री वृद्धाश्रम, पणदूर येथील सविता आश्रम यांनासुद्धा उमेद फाऊंडेशनने वेळोवेळी मदत केली आहे. यावेळी दिविजा वृद्धाश्रमाच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तात्काळ उमेद संस्थापक श्री प्रकाश गाताडे सर आणि उमेद सदस्य श्री.विजय मसुरकर सर यांनी संपर्क साधला आणि दिविजा वृद्धाश्रमाला आवश्यक असलेले सुमारे १९ हजार ३६५ रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य पोहोच करण्यात आले.
यावेळी उमेद सदस्य श्री. सुहास पाताडे सर, श्री जाकीर शेख सर हे उपस्थित होते तसेच उमेद सदस्य सूर्यकांत चव्हाण सर, जुहीली सावंत मॅडम, विजय भोगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत सुपूर्द करण्यात आली. मागील आठवड्यात सविता आश्रमाला सुद्धा उमेद फाउंडेशनने १३,५००/- रुपयांचे जीवनावश्यक साहित्य पोहोच केले आहे. उमेद फाऊंडेशन समाजातील सामाजिक जाणिवा जपणाऱ्या दात्यांचा आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवून विश्वास सार्थ ठरवत असल्याबद्दल, फाऊंडेशनला अशा सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व स्तरातून कौतुक आणि पाठिंबा मिळत आहे. सध्या उमेद फाउंडेशनचा गरजू व निराधार मुलांसाठीचा उमेद मायचं घर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − one =