मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई व ठप्प झालेल्या वीज पुरवठा तात्काळ चालू करण्याविषयी केल्या सूचना
मालवण तालुक्याच्या किनारपट्टी व ग्रामीण भागासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तौक्ते वादळ धडकल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांची राहत्या घरांची झालेली पडझड, झाडांची पडझड, विजेचे खांब पडून खंडित झालेला वीजपुरवठा याबाबत मालवण तालुक्याचा आढावा कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार कार्यालय मालवण येथे घेतला.
मालवण तालुक्यामध्ये 450 विजेचे खांब पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वीज खंडित झाली तसेच देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवण शहर, तोंडवळी, तळाशील, आचरा गावांसह संपूर्ण मालवण व कुडाळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागात देखील राहत्या घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालवण तालुक्याच्या किनारपट्टी भागाची पाहणी यावेळी करण्यात आली. याबाबत नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी याकरिता स्थानिक प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच यावेळी झालेली वित्तहानी व विजेच्या पोलांची पडझड होऊन वीज खंडित झाल्याबद्धल मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामांची कल्पना दिली. यामुळे तालुक्यामधील पडलेले विजेचे पोल पुढील 4 दिवसांत पूर्ववत बसवण्याकरिता रत्नागिरी व सांगली मधून 5 गॅंग जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. पुढील 4 दिवसांत विजेच्या पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देखील यावेळी बैठकीमध्ये वीज वितरण च्या अधिकारी यांना देण्यात आल्या. तसेच स्थानिक नागरिकांच्या घरावर पडलेली झाडे बाजूला करण्याकरिता 2 गॅंग व 4 ट्री कटर यावेळी मालवण तालुक्याकरिता देण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, वीज वितरण चे अभियंता गिरकर, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष झिरगे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.