– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेल्या जिल्ह्यातील बालकांची माहिती तातडीने संकलीत करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड – 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड – 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी या सूचना दिल्या.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या बैठकीमध्ये करावयाच्या कार्यवाहीचा आढावा अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी यांनी घेतला. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती घेण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी सूचना देऊन याविषयीची माहिती संकलीत करण्यात यावी. जिल्ह्यातील सुधारगृह व महिलागृहांमधील बालक व महिला तसेच सर्व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यावेळी म्हणाले की, दत्तक प्रकरण तसेच मुलांविषयी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाचे काम महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने अशा प्रकारे अनाथ झालेल्या प्रत्येक बालकाची माहिती तातडीने पोलीस विभागास मिळावी. जेणेकरून अशा बालकांचा बाल कामगार म्हणून वापर होणार नाही किंवा त्यांची तस्करी होणार नाही याची वेळीच खबरदारी घेता येईल. सदर माहिती रोजच्या रोज मिळणेही तितकेच गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी कृती दलाच्या कमाकाजाविषयीची माहिती सदस्यांना दिली. तसेच कृती दल कशा प्रकारे काम करेल याविषयीही माहिती दिली.
शासनाने चाईल्ड हेल्पलाईन म्हणून 1098 हा क्रमांक जाहीर केला आहे. तरी नागरिकांनी बालकांच्याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडत असेल, तसेच कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांची तस्करी अथवा त्यांना बालकामगार म्हणून वापरणे किंवा गैर मार्गाने त्यांना दत्तक घेणे असा प्रकार घडत असल्यास 1098 या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांशीही याविषयी संपर्क साधता येणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अनाथ बालकांची माहितीही नागरिकांना देता येणार आहे. तरी बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नागरिकांनीही सक्रीय सहभाग घ्यावा.
कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्याबाबत काही गुन्हे घडले आहेत. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने याविषयी कृती दल स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदल स्थापन केले आहे. या कृतीदलाच्या माध्यमातून अशा बालकांना न्याह हक्क मिळवून देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्यासह या कृतीदलामध्ये पोलीस अधिक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
00000