आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे उघड
सिंधुदुर्ग
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जात होता. मात्र आंबोली पोलिसांनी ई-पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याने पृथ्वीचा गोंधळ उडाला. ई पास असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितले त्यानंतर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटरला एक तास आंबोलीत थांबून राहावे लागले.
बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे सांगितले. त्यामुळे आंबोली पोलिसांनी पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच थांबवले. पृथ्वी शॉने आंबोलीतूनच ऑनलाईन पध्दतीने ई पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन मोबाईलवर आल्यावर तो पास आंबोली पोलिसांना दाखवून गोव्याकडे मार्गस्थ झाला.