राजन तेली यांची सिईओकडे मागणी
कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन काही विशेष मागण्या केल्या.यावेळी त्यांच्यासमवेत जिखा परिषद अध्यक्षा संजना सावंत,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,विषय समिती सभापती शर्वाणी गावकर,महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्हा होरपळून निघत असून महाराष्ट्रात जिल्ह्याचा मृत्युदर अग्रस्थानी पोचलेला आहे.जिल्हा आरोग्य प्रशासन,जिल्हा परिषद यासाठी मेहनत घेत असले तरी यात काही मूलभूत गोष्टी प्राधान्याने हाती घ्यायची गरज असल्याचे राजन तेली यांनी सीईओ प्रजित नायर यांच्या निदर्शनास आणून दिले.
आणि काही प्रमुख मागण्या केल्या.त्यातील पहिली मागणी म्हणजे लसीकरण उपक्रमातील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणण्याची मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीत डाटा ऑपरेटर यांना सूचना देऊन गावातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत करण्यास सांगावे,व ग्रामपंचायत स्तरावर त्याची योग्य ती प्रसिद्धी करावी.लसीकरण मोहिमेबाबतचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र यांनी वेळेत कळवावे,तांत्रिक कारणाने दिरंगाई होत असलेल्या कोवॅक्सिंन दुसऱ्या डोसची तातडीने व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद प्रशासनाने मागील कोरोना काळात माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविली होती,घरोघरी झालेल्या सर्व्हेक्षणमुळे वेळीच रुग्ण शोध घेत आला होता,परिणामी त्याची तीव्रता कमी करणे सोपे झाले होते,या दुसऱ्या लाटे दरम्यान पुन्हा एकदा या मोहिमेला गती देऊन सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करावे अशीही मागणी त्यांनी केली.
या साथरोग निवारण कामी जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कामात आहे.जिल्हा परिषद पदाधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे या परिस्थितीवर मात करणे शक्य होत आहे.यापुढे जात जिल्हा परिषदेने स्वतःचा असा एक ‘अद्यावत माहिती कक्ष’ उभारणे आवश्यक आहे याद्वारे जिल्ह्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रवेशसंबंधी योग्य वेळी,योग्य माहिती मिळू शकेल.ज्यात जिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय, शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमधील बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता वैगरे बाबी समाविष्ट असतील,ज्यामुळे कोरोना रुग्णांची प्रवासात होणारी ससेहोलपट थांबेल.
या साथीवर मात करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते आरोग्य यंत्रणेशी जोडून काम करत आहेत.या प्रमुख विषयांच्या मागणीवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असेही ते म्हणाले.