सतीश सावंत; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी…
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय नसल्याने जनावरे दगावत आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील लघु पशु चिकित्सालय सुरु करावीत, अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
यावेळी जिल्हा बैंक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख मंगेश लोके उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांना देण्यात आलेल्या निवेदनात ‘कोरोना संक्रमणामुळे अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे युवक गावी आले असून शेती, दुग्ध, कुक्कुट पालन आणि शेळी पालन या व्यावसायाकडे वळले आहेत. तालुक्यात ४५०० ते ५००० दुधाळ जनावरे आहेत. दर दिवशी २ हजार लीटर दूध संकलन होते. परंतु पशु वैद्यकीय चिकित्सालय नसल्याने जनावरांवर वेळीच उपचार होत नाहीत. परिणामी जनावरे दगावतात. त्यामुळे जनावरांवर उपचार व देखभाल होण्यासाठी चिकित्सालय सुरु करण्याबाबत आदेश व्हावेत’, अशी मागणी करण्यात आली आहे.