सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सीजनचा तुटवडाही भासत आहे. रायगड कोल्हापूर येथून ऑक्सिजन उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेर्णे ऑक्सीजन प्लांट मधील ऑक्सीजन साठा सिंधुदुर्गसाठी देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोव्यात ऑक्सिजनचा साठा आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कुलदेवता सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील आहे. त्यामुळे सिंधुदुर्गासाठी त्यांनी दाखवलेले दातृत्व निश्चितच आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले. लसीकरण बाबत ऑनलाईन नोंदणी होताना त्याच्या तालुक्यातील केंद्रानुसारच व्यक्तीला लस देण्याच्या दृष्टीने आपण राज्यातील आमदारांच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढू व लसीचा घोळ होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
आमदार दीपक केसरकर यांनी आज झूम ॲपद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले कोरोना आणि पाणी प्रश्न यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचे ठरवले आहे. सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले या तीन तालुक्यात कोणीही या प्रश्नावरुन राजकारण करणार नाही. सावंतवाडी नगरपालिकेने ही माजगाव व चराठा या दोन गावांना तीन दिवसाने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित केले आहे.