You are currently viewing आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र

आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय

मुंबई

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्यासाठी महापालिकेने मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दादरमध्ये मंगळवारपासून सुरू करण्यात आले. या केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी एक ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दादरमध्ये कोहिनूर वाहनतळावर ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबईतील २४ विभागांमध्ये मुख्यतो मोकळ्या मैदानावर असे केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

अंधेरी क्रीडा संकुल, कुपरेज मैदान, शिवाजी स्टेडियम, ओव्हल मैदान, ब्रेबॉर्न स्टेडियम, एमआयजी मैदान, रिलायन्स जिओ गार्डन, वानखडे स्टेडियम, संभाजी उद्यान (मुलुंड), सुभाष नगर मैदान (चेंबूर), टिळक नगर मैदान (चेंबूर), घाटकोपर पोलीस मैदान, शिवाजी मैदान (चुनाभट्टी) येथे ड्रायव्हिंग केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे.

असे असावे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र
– मैदानावर लसीकरणासाठी येणाऱ्या गाड्यांची एकच रांग असावी. या रांगेमुळे मैदानाबाहेरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये.

– लसीकरण केंद्रावरील कर्मचारी वर्ग आणि लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांकरिता तात्पुरती निवारा उभारण्यात यावा.

– फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.

– ६० वर्षांवरील नागरिक यांना दोन्ही कोविशिल्ड लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन येणे बंधनकारक असेल.

– लस घेण्यास येणाऱ्या व्यक्तीने स्वतः गाडी चालवून घेऊ नये, त्यांच्यासोबत कोणी परिचित असावे.

– ४५ वर्षांवरील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून वेळ मिळाल्यानंतर यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा