You are currently viewing चौकेसाठी मिळालेले “कोव्हॅक्सीन”चे डोस अन्यत्र दिले – हरी खोबरेकर

चौकेसाठी मिळालेले “कोव्हॅक्सीन”चे डोस अन्यत्र दिले – हरी खोबरेकर

आरोग्य विभागाकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही

ओरोस
मालवण तालुक्यातील चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेले को व्हक्सिन चे २५० डोस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर अन्यत्र दिले असल्याचा खळबळजनक आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी आरोग्य समिती सभेत केला. तसेच हे डोस गेले कोठे असा प्रश्न उपस्थित केला. मात्र याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही

जि. प. आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने आरोग्य समिती सभापती डॉ. अनीशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, समिती सदस्य हरी खोबरेकर, प्रीतेश राऊळ, नूतन आईर, लॉरेन्स माण्येकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. याबाबत आढावा घेतला असता चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात को व्हक्सिन चा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी या लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या केंद्रासाठी २५० को व्हॅक्सिनचे डोस मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे डोस चौके प्राथमिक आरोग्य केंद्रा ला मिळालेच नाहीत. ते डोस परस्पर अन्यत्र देण्यात आले असल्याचा आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी सभेत केला. तसेच या आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेले को व्हक्सिनचे २५० डोस कोठे गेले ? कोणाच्या मर्जीने अन्यत्र देवून चौके पंचक्रोशीतील ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करत आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांना धारेवर धरले. मात्र यावर आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे लसीकरण साठी नोंदणी करणे आवश्यक या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वाहनांचे टायर खराब झाले असल्याने त्या वाहनांचा केव्हाही अपघात होवू शकतो. त्यामुळे नवीन टायर खरेदी साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सदस्य हरी खोबरेकर यांनी केली आहे. खनिज निधी मधून मिळणाऱ्या रुग्णवाहिका देताना रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी सदस्य प्रितेश राऊळ यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =