अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
कणकवली
कणकवली तालुका हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनत आहे. गावागावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यामुळे दगावणाऱ्या व्यक्तिंच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच पुरेशा साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवेचा खेळखंडोबा थांबविण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भाजपा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे रुपांतर कोव्हिड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. परंतु या रुग्णालयात कोविड संबंधित तसेच अन्य रुग्णांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. कोव्हिड व नॉन कोव्हिड रुग्णांना एकाच ठिकाणी तपासले जात असून, उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे नॉन कोव्हिड रुग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होतोय. कोव्हिड वॉर्डच्या बाजूलाच डायलेसिस सेंटर आहे. त्यामुळे याचा फटका डायलेसिस रुग्णांनाही बसत आहे. त्यामुळे स्वॕब सेंटर व कोव्हिड सेंटर उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने हलविण्यात यावे, अशी मागणी संतोष कानडे यांनी केली आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालयातील मृत व्यक्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येत असलेले डिफ्रिजर गेले ६ महिने बंद आहे. ते तातडीने चालू करण्यात यावे आणि कोव्हिड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी. दोन-दोन तास रूग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे केवळ १०८ रुग्णवाहिकेवर अवलंबून राहू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णांना ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवायचे झाल्यास बेड फुल झाल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची सरसकट लुटमार चालू आहे. त्यामुळे अशा खासगी सेंटरमध्ये दर निश्चित करण्यात यावे. त्यासोबतच खासगी कोव्हिड सेंटरमध्ये अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिवीरचा मागणीनुसार पुरवठा करण्यात यावा, असे संतोष कानडे यांनी सांगितले आहे. सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कारवाई न झाल्यास कणकवली भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा त्यांच्यामार्फत देण्यात आला आहे