मालवण
आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचाल तर वाचाल या म्हणीचा अर्थ सार्थ करण्यास आणि वाचन प्रेरणा वाढविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग तर्फे भव्य राज्यस्तरीय पुस्तक विश्लेषण ऑडिओ स्पर्धेचे आयोजन २३ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धा उपक्रमात खुल्या गटातून कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ, इयत्ता अकरावी सायन्स (तुकडी अ ) ची विद्यार्थिनी आणि मसुरे गावची कन्या कु. वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. याचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला.
वैभवी हिला प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र आणि रोख रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेशचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, परीक्षक प्रसिध्द साहित्यिका सौ राजश्री भावार्थी, मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरकणी राजश्री बोहरा, अध्यक्षा सौ गीतांजली वाणी, कार्याध्यक्ष विठ्ठल घाडी, उपाध्यक्ष योगिता तकतराव, सचिव सौ कल्पना पाटकर, सरचिटणीस सौ राखी जोशी, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ चे मुख्याध्यापक मनोहर गुरबे माजी मुख्याध्यापक श्री प्रेमनाथ प्रभूवालावलकर, उपप्राचार्य ज्युनियर कॉलेज श्री राजकिशोर हावळे, वर्गशिक्षक पी बी कदम, सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
वैभवी हिने प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध अशा छावा या ऐतिहासिक कादंबरीचे ऑडिओ विश्लेषण स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून स्पर्धेसाठी पाठविले होते. वैभवी हिने यापूर्वीही विविध तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय कला, क्रीडा, नृत्य, वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध लेखन, कथाकथन स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले असून तिने कराटे मध्ये इंटरनॅशनल स्पर्धेतही यापूर्वी घवघवीत यश मिळविले होते.वैभवी हिचे मसुरे गावामध्ये कौतुक होत आहे.