अंतिम यात्रा

अंतिम यात्रा

दिसताक्षणी ज्याला
लाखोली वाहत होते.
तो गेल्यावर मात्र त्याचे
गुणगान आज गात होते.

सजली होती अंतीमयात्रा,
फुलांचा वर्षाव करत होते.
हारतुरे गळ्यात राहत नव्हते,
एवढे आज त्याला वाहत होते.

पदस्पर्श करून त्याचे,
खोटे खोटे हात जोडत होते.
अश्रू नव्हतेच डोळ्यात,
उगाच डोळे पुसत होते.

मनात नव्हतं सोयरसुतक,
चेहरा दुःखी भासवत होते.
चेहरा मनाचा आरसा असतो,
सोयीस्कर ते विसरत होते.

खांदा द्यावया मागे पुढे,
उगाचंच ते धावत होते.
मित्र खरा मीच जसे,
प्रेतयात्रेत ते वावरत होते.

सरणावरती प्रेत त्याचे,
आज एकटेच झोपले होते.
रोजच्याच पार्टीतले सोबती,
रात्रीच्या तयारीत गुंतले होते.

मृत्यूनंतर चांगले वाईट,
सर्वच गुण समान होते.
कोण नसतं कोणाचेच हे,
गेल्यानंतरचे प्रमाण होते.

(दिपी)
दीपक पटेकर. सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा