आ. नितेश राणे यांना दिले निवेदन
वैभववाडी
लसीकरणासाठी अरुळे, सडूरे, शिराळेसह सहा गावांना वैभववाडी येथे पायपीट करावी लागत आहे.शिवाय अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी अरुळे सरपंच उज्वल नारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार नितेश राणे, तहसीलदार रामदास झळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांना देण्यात आले आहे.
तालुक्यात सध्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालय तसेच उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र या दोनच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. तालुक्यात दोनच केंद्र असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुंबळ गर्दी होत आहे. राज्यात प्रत्येक उपकेंद्र स्तरावर लसीकरण केंद्र उभारण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य संचालक पुणे यांनी दिले आहेत. तसे परिपत्रक मार्च मध्ये काढण्यात आले आहेत. या परिपत्रकात मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. शिवाय लॉकडाऊन मुळे दळणवळणाची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमुळे वृद्ध नागरिकांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणासाठी येणे शक्य होत नाही. तालुक्यातील शिराळे, कुर्ली नावळे ही गावी वैभववाडी पासून सुमारे १५ किल्लोमीटर अंतरावर आहेत. तर सडूरे,अरुळे, सांगूळवाडी, निमअरुळे ही गावे सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहेत. दळणवळणाची व्यवस्था नसलेने येथील नागरिकांना पायपीट करून वैभववाडी येथे येणे शक्य नाही.
ग्रामीण भागातील बहुतांश वृद्ध नागरिकांचे याच कारणामुळे अद्यापही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून नजीकच्या सहा गावांतील सुमारे सहा हजार जेष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होईल अशी मागणी अरुळे सरपंचांनी केली आहे.
लसीकरण केंद्राकरिता संगणक व संगणक चालक याची भासणारी कमतरता दूर करण्याची जबाबदारी अरुळे ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यामुळे तात्काळ लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करू असे आश्वासन तहसीलदार रामदास झळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिले आहे. लसीचा पुढील कोटा आल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या द्वियिनी स्पष्ट केले.