हत्तींचा वावर मनुष्य वस्तीत वाढल्याने ग्रामस्थानमध्ये भितीचे वातावरण
दोडामार्ग
तिलारी खोऱ्यात हत्तीची दहशत कायम असून आता हत्ती खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकताना दिसत आहेत. हेवाळे बाबरवाडीत आता हत्तींनी मुक्काम ठोकला असून आता रात्रंदिवस उपद्रव सुरू आहे. वनखाते आणि राज्यकर्ते निद्रिस्त असून सर्वच लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत आहे, आमदार, खासदार व पालकमंत्री यांनाही हत्ती समस्येचा विसर पडला असून हत्ती पार्क, हत्ती पकड आदी अनेक मोहिमा ह्या शासनाने म्यान केलेल्या दिसत आहेत. लोक रात्रंदिवस हत्तीच्या दहशतीखाली असून तथाकथीत राजकारणीही या प्रश्नी सोयीचे राजकारण करत असून कुणाचेच या प्रश्नाकडे लक्ष नाही, मुख्य उपवनसंरक्षकांचेही तिलारी दौरे या प्रश्नी झाले असून मात्र हत्ती समस्येकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. या हत्ती प्रश्नी बळीराजाचे रोजचेच मरण असून ऐन मोक्याच्या क्षणी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाताना बघून बळीराजा मात्र आता वेगळ्या विचारात आहे. फटाके, आटोम्बॉम, अग्निबाण पुरविण्याची मागणी करूनही वनखात्याकडे याची उपलब्धता नसल्याने वनखाते नेमकं करतय तरी काय? हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.
गेले दोन दिवस बाबरवाडी व बोर्येवाडीत हत्तीची प्रचंड दहशत असून खाद्य मिळवण्यासाठी ते वस्तीकडे वळताना दिसत आहेत.वस्ती लगत मिळणारे फणस हे सध्या हत्तीचे खाद्य असून यासाठी थेट लोकवस्तीत हत्तींचा रात्रीचा संचार पाहावयास मिळत आहे. लोक कमालीचे भीतीखाली असून वनखाते, राज्यकर्ते, राजकीय मंडळी याकडे लक्ष देणार का? असा सवाल ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.