फवारणी करून कोरोना पळणार नाही तर सर्वपक्षीय बैठक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे

फवारणी करून कोरोना पळणार नाही तर सर्वपक्षीय बैठक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे

– सुदेश आचरेकर यांची टीका.

मालवण

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. अनेकांचे प्राण जात आहेत. त्यामुळे शहरात केवळ फवारणी करून कोरोना पळणार नाही तर सर्वपक्षीय बैठक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आबा हडकर, नगरसेविका ममता वराडकर, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, पंकज पेडणेकर, राजू बिडये आदी उपस्थित होते. श्री. आचरेकर म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शहरात होत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना घरोघरी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. येथील रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा असतानाही रुग्णालयात कोरोनावरील प्रभावी औषधे, गोळ्यांचा साठा उपलब्ध नाही. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मनमानी करत आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही यावर पालिका प्रशासन, आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे राज्यकर्ते मोकाट कोरोना सुसाट अशी शहरातील अवस्था झाली असल्याची टीका त्यांनी केली.

रुग्णांना ओरोस येथील कोविड सेंटर मध्ये पाठविले जाते. शहरात काही दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला घरात पडली असता तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असताना ऑक्सिजन पातळी कमी असल्याचे कारण दाखवून ओरोस येथील कोविड सेंटर मध्ये पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा असलेल्या या रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जात नसेल ते रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करा. ते जमत नसेल तर रुग्णालयाचा कोंडवाडा करून रुग्णालयात जनावरे बांधा अशी टीका आचरेकर यांनी वैद्यकीय यंत्रणेवर केली. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण तडफडून मरत आहेत असे असताना कोरोना तपासणीचे अहवाल आठ दिवसानंतर उपलब्ध होत आहेत. रुग्ण आढळलेल्या ठिकाणी कोणतेही सॅनिटायझर केले जात नाही त्या ठिकाणी पालिका किंवा वैद्यकीय यंत्रणेची व्यक्ती पोहोचत नाहीत. कुंभारमाठ येथील कोविड सेंटरमध्ये कोणतीही सुविधा नाही, रुग्णांना सकस आहार मिळत नाही अशी अवस्था असताना पालिकेचे व आरोग्य यंत्रणेचे नियोजन शून्य आहे. नगराध्यक्षांनी यापूर्वीच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन बैठक घेणे आवश्यक होते. मात्र त्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यकर्ते मोकाट आणि कोरोना सुसाट अशी अवस्था आहे. भविष्यात या गंभीर परिस्थितीकडे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आचरेकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा