ग्राहक पंचायतची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी.
वैभववाडी.
मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने सर्वसामान्यांचे जिने असह्य झाले आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाने थोडी विश्रांती घेतलेली होती. परंतु आता दुसऱ्या वाटेने हाहाकार माजवला असताना शासकीय धान्य दुकानांवर ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरण केले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.सर्व शासकीय कार्यालये, खाजगी अस्थापना याठिकाणी थम मशीनद्वारे हजेरी घेणे बंद असताना केवळ मशीनला थम लावण्याचा शासनाचा आदेश असल्याने यातून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबत तातडीने आदेश काढून ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने सचिव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मा श्री दादासाहेब गीते यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
मागीलवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे धान्य वितरण करणे दुकानदारांना सोपे झाले होते. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने अनेकवेळा रेंज नसल्याने ग्राहकांना थांबून राहावे लागते. एकाच वेळी शेकडो ग्राहकांची धान्य दुकानासमोर गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्स राखणे अवघड जाते.शासकीय धोरणामुळे रेशन दुकानदार मशीनद्वारे धान्य वाटपाला चांगले धास्तावले आहेत. शासनाच्या ऑनलाईन धान्य वितरण धोरणामुळे सर्वसामान्य लोकांना धान्य मिळणे अवघड होत आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेत मिळावे तसेच ग्राहकांच्या आणि दुकानदारांच्या आरोग्याचा विचार करता शासनाने सर्व दुकानदारांना ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा. श्री. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.