ब्रेक दी चेनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केली कारवाई
कणकवली
शासनाने ब्रेक दि चेन अंतर्गत लॉकडाऊन संदर्भात नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी अखेर तहसीलदार थेट रस्त्यावर उतरले. इतर अधिकारी व ग्रामपंचायतीच्या मदतीने तहसीलदारांनी गुरुवारी दुपारी कलमठ येथील चार विक्रेत्यांवर कारवाई करत चार हजार रुपयांचा दंड वसूल केला.
ब्रेक दी चेन च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कलमठ येथील दोन भाजीविक्रेते, एक किराणामाल विक्रेते व एका कांदे विक्रेत्यावर गुरुवारी दुपारी तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या पथकाने थेट कारवाईचा बडगा उचलला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून घेत संबंधित चौघांवरही प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर चौघांनीही दंड भरला. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार श्री. पवार यांनी दिला आहे.