You are currently viewing लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळेच कोरोना दूसरी लाट आलीतरी आरोग्याची दुरावस्था…

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळेच कोरोना दूसरी लाट आलीतरी आरोग्याची दुरावस्था…

खासदार-आमदार जोडगळीने फोटोसेशन न करता जनतेला सुविधा द्याव्यात; मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टिका

मालवण

गेल्या मार्च पासून या मार्च पर्यंत रस्त्याच्या टेंडर मध्ये गुंतलेल्या लोकप्रतिनिधींना मालवणातील आरोग्य सुविधांचे काही देणे घेणे नाही. कोरोनाची दुसरी लाट येणार हे १६ सप्टेंबर २०२० ला जागतिक आरोग्य संघटनेने संगितले होते.असे असताना अत्यावश्यक आरोग्य सुविधांबरोबरच डाॕक्टर, महिला डाॕक्टर, नर्स, परिचालक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने का होईना भरती का करण्यात आली नाही असा सवाल मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

मालवणातील कोविड केअर सेंटर येथे बेडची संख्या १०० करा. तसेच अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह अन्य अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मालवण तालुक्यात आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करा अशा सूचना लोकप्रतिनिधींनी प्रशासनास दिल्या आहेत. त्यावर इब्रामपूरकर यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, खाटांची संख्या वाढवुन काय उपयोग काय? आवश्यक यंत्रसामुग्री, कर्मचारी वर्ग नियुक्ती, लागणाऱ्या निधीची तरतुदीची आज तातडीने आवश्यकता आहे. आज कोव्हिडमुळे मालवण कुडाळ मधील अनेक जण दगावत आहेत. कुडाळमधील महिला बाल रुग्णालय २ महिन्यात सुरू होणार अशी घोषणा खासदारांनी जून मध्ये केली होती पण प्रत्यक्षात आता ८ महिने होवून सुद्धा सुरू करू शकले नाहीत. मालवणातील डायलेसिस मशीन गेले दोन वर्ष बंद आहे. याबाबत मनसेने सातत्याने आवाज उठवला. आमदारांनी एक महिन्यात डायलिसीस मशीन सुरु करणार असल्याचे सांगितले होते. ग्रामीण रुग्णालय तसेच सध्या कोव्हिड सेंटर म्हणून सुरू केलेल्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये व्हेंटिलेटरची कमतरता आहे. रस्त्यांच्या टेंडर मधील १३० कोटीतले ४ कोटी कुडाळमधील महिला बाल रुग्णालयासाठी खर्च केले असते तर आज अनेक लोकांचे जीव वाचले असते. म्हणूनच कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या लोकप्रतिनिधींची आरोग्य व्यवस्थेबाबत भूमिका ही ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशीच आहे.
आज मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये एकच डाॕक्टर बालाजी पाटील आणि कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिला डाॕक्टर पद तर आॕगस्टपासुन रिक्त आहे. त्यामुळे सध्या असलेल्या डाॕक्टर आणि कर्मचारी वर्गाला नियमित रुग्णांची तपासणी, अपघाती सेवा, कोव्हीड रुग्णांची तपासणी, कोव्हीड रुग्णांची चाचणी, लसीकरण अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत.१ मे पासुन लसीकरणावर प्रचंड ताण येणार आहे.त्याचे नियोजन नाही.आवश्यक मनुष्यबळ नाही.

कोव्हीडची तिसरी लाट येण्याची चर्चा काही प्रसारमाध्यमांमध्ये आहे. या अगोदर इतर गोष्टींसाठी जशी आमदार-खासदार या जोडगोळीने काल फोटोसेशन आणि पेपरबाजी केली. आजही तशीच नाटकबाजी आरोग्याच्या प्रश्नांवर ही जोडी करत आहेत. म्हणूनच आमदार-खासदार या जोडगोळीने फक्त फोटोसेशन न करता जनतेसाठी आरोग्य सुविधा सक्षम करण्याबरोबरच नविन डाॕक्टर, महिला डाॕक्टर, नर्स, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर यांना तात्काळ कंत्राटी पद्धतीने का होईना नियुक्तिपत्र देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत असे इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + twelve =