एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.
पुढील चार दिवसांच्या पावसाची चाहूल आज राज्यात काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडला. यावेळी जोरदार पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.
आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या. शहारपूरमधील खर्डी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दरम्यान, आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे.